काश्मिरात सहा महिन्यांत ९२ दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Published: July 7, 2017 01:56 AM2017-07-07T01:56:00+5:302017-07-07T01:56:00+5:30

सुरक्षा जवानांनी या वर्षी काश्मीर खोऱ्यात सुरू केलेल्या मोहिमेत ९२ दहशतवाद्यांचा खातमा केला आहे. ही संख्या २ जुलैपर्यंतची आहे.

The death of 92 terrorists in Kashmir in six months | काश्मिरात सहा महिन्यांत ९२ दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मिरात सहा महिन्यांत ९२ दहशतवाद्यांचा खात्मा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सुरक्षा जवानांनी या वर्षी काश्मीर खोऱ्यात सुरू केलेल्या मोहिमेत ९२ दहशतवाद्यांचा खातमा केला आहे. ही संख्या २ जुलैपर्यंतची आहे. २0१६मध्ये याच काळात ७९ दहशतवादी चकमकींमध्ये मारले गेले होते. या वर्षी ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या २0१२ वा २0१३ या दोन वर्षांहून अधिक
आहे.
काश्मीर खोऱ्यामध्ये २0१२ रोजी ७२ तर २0१३मध्ये ६७ दहशतवादी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकींमध्ये ठार झाले होते. हा आकडा २0१४ साली वाढून ११0 वर पोहोचला. नंतर २0१५ साली १0८ तर २0१६मध्ये १५0 दहशतवादी काश्मीरमध्ये मारले गेले, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिली. या कारवाईचे श्रेय लष्कर, केंद्रीय दले राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणांमधील उत्तम समन्वय यांना दिले जात आहे.
दोन वर्षांत जे दहशतवादी मारले गेले, त्यात अनेक स्थानिक आणि बरेच पाकिस्तानीही आहेत. एवढेच नव्हे, तर बुऱ्हाण वणी आणि बशीर यांच्यासारख्या अतिरेकी संघटनांच्या म्होरक्यांचाही त्यात समावेश आहे.
खोऱ्यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन, त्यांचा खात्मा करण्यासाठी मोकळीक देण्यात आली आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू करण्याआधी पूर्ण योजना तयार करण्यात येते. त्यामुळे सुरक्षा दलांचे कमीतकमी नुकसान होते आणि दहशतवादाविरोधी मोहीमही यशस्वी होते, असे गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे.
काश्मीरमध्ये खातमा झालेल्या दहशतवाद्यांची संख्या वाढली असताना, घुसखोरीची प्रकरणे कमी होत आहेत, असा दावा गृह मंत्रालयातर्फे करण्यात आला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, २0१६ साली घुसखोरीच्या ३७१ प्रकरणांची नोंद झाली. या वर्षी मे महिन्यापर्यंत हा आकडा १२४ असून, घुसखोरीच्या प्रयत्नांत असलेल्या अनेक दहशतवाद्यांनाही सुरक्षा दलाने संपविले आहे.


काश्मीरमध्ये उद्भवणारी कोणतीही स्थिती हाताळण्यास आम्ही सज्ज असून, त्यासाठी केंद्रीय निमलष्करी दलाच्या २१४ तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत, असे केंद्रीय गृहसचिव राजीव मेहर्षी यांनी सांगितले. एका तुकडीत १०० जवान असतात. राज्य पोलीस दल आणि दहशतवादी कारवायांचा मुकाबला करण्यास तैनात सुरक्षा दलाशिवाय काश्मीर खोऱ्यात हा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
 
दगडफेक वाढली
दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये या वर्षी खूपच वाढ झाली आहे. यंदा २ जुलैपर्यंत काश्मीर खोऱ्यात दहशतवादाच्या १६८ घटना घडल्या, तर २0१६ साली याच काळात केवळ १२६ दहशती कारवाया खोऱ्यात झाल्या होत्या. दगडफेकीच्या घटनांमध्ये यंदा वाढ झाली आहे.

बुऱ्हाण वणी दिनाला इंग्लंडमध्ये प्रतिबंध
भारताच्या विरोधामुळे बर्मिंगहॅम सिटी कौन्सिलने बुऱ्हाण वणी स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या बुऱ्हाण वणीच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने बर्मिंगहॅममध्ये काहींनी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले होते. भारत सरकारने त्याबद्दल नाराजी व्यक्त करून, त्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये, अशी भूमिका घेतली होती. बुऱ्हाण वणीला भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी गेल्या वर्षी ८ जुलै रोजी कंठस्नान घातले होते.
 
२१ हजार अतिरिक्त जवान तैनात; इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा आदेश
हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणी मारला गेलेल्या चकमकीला शनिवारी एक वर्ष होत असून, त्यामुळे जम्मू-काश्मीर खोऱ्यात तीव्र निदर्शने होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था अगदी चोख करण्यात आली आहे.
विशेषत: अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात निमलष्करी दलाचे २१ हजार अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. राज्य पोलिसांनी पुढील आदेशापर्यंत इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सोशल मीडियाच्या सर्व साइटस् रोखण्याचे किंवा इंटरनेट सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: The death of 92 terrorists in Kashmir in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.