हिंदूत्ववाद्यांच्या विरोधामुळे जीवंतपणीच 'लेखका'चा मृत्यू
By admin | Published: January 14, 2015 01:18 PM2015-01-14T13:18:00+5:302015-01-14T13:23:05+5:30
हिंदूत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे तामिळनाडूमधील ख्यातनाम लेखक पेरुमल मुरुगन यांच्यावर लिखाण बंद करण्याची दुर्दैवी वेळ ओढावली आहे. '
Next
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १४ - हिंदूत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे तामिळनाडूमधील ख्यातनाम लेखक पेरुमल मुरुगन यांच्यावर लिखाण बंद करण्याची दुर्दैवी वेळ ओढावली आहे. 'पेरुमल मुरुगन हा लेखक मृत पावला असून या पुढे मी प्राध्यापक पी. मुरुगन म्हणून राहीन, ज्या वाचकांकडे माझी पुस्तक असतील त्यांनी ती जाळून टाकावीत' असे भावनिक विधान त्यांनी फेसबुकवर केले आहे.
तामिळनाडूमधील लेखक पेरुमल मुरुगन यांच्या मधोरुभागन या पुस्तकावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. या कादंबरीवर तामिळनाडूमधील हिंदूत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या पुस्तकामुळे हिंदू धर्मीय आणि विशेषत: महिला भक्तांचा अपमान झाल्याचा आरोप हिंदूत्ववादी संघटनांनी केला होता. या कादंबरीवर बंदी टाकावी आणि लेखक मुरुगन यांना अटक करावी अशी मागणी हिंदूत्ववादी संघटना करत आहेत. या कादंबरीवरुन हिंदूत्ववादी नेत्यांनी पेरुमल यांच्यावर जहरी भाषेत टीकाही केली होती. अखेरीस दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदूत्ववादी संघटनांचे नेते आणि पेरुमल यांच्यात चार तास बैठक झाली. या बैठकीत पेरुमल यांनी पुस्तकातील आक्षेपार्ह भाग वगळण्यास आणि बिनशर्त माफी मागण्याची तयारी दर्शवली होती. या घडामोडींनंतर हताश झालेल्या मुरुगन यांनी लिखाण कायमचेच बंद करण्याची घोषणा फेसबुकवरील पेजद्वारे केली आहे. 'माझ्यातील लेखकाचा मृत्यू झाला आहे. तो देवही नाही आणि माझा पुनर्जन्माच्या गोष्टींमध्ये विश्वासही नाही. यापुढे माझी ओळख लेखक म्हणून राहणार नसून मी एक सामान्य शिक्षक आहे' असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रकाशकांनी माझ्या अप्रकाशित कादंब-या व कथासंग्रह छापू नये, त्यांचे नुकसान भरुन देण्याचा मी प्रयत्न करीन, वाचकांनीही माझी पुस्तकं जाळून टाकावी असे त्यांनी नमूद केले. हिंदूत्ववादी संघटनेच्या दबावापोटी लेखकाने कायमचे लिखाण बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे.
नेमका वाद काय आहे ?
पेरुमल मुरुगन हे प्राध्यापक असून तामिळनाडूमधील एका कॉलेजच्या आर्ट्स विभागात ते काम करतात. मुरुगन यांच्या आत्तापर्यंत नऊ कादंब-या प्रकाशित झाल्या आहेत. मुरुगन यांच्या मधोरुभागन या कादंबरीमध्ये १०० वर्षांपूर्वीची तामिळनाडूतील एका महिलेची कथा मांडण्यात आली आहे. गावातील एका मंदिराच्या जत्रेत गर्भधारणेसाठी विवाहीत महिला परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवू शकतात. ही महिला आपल्या पतीच्या इच्छेविरोधात या जत्रेत सामील होते अशा स्वरुपाचे कथानक या पुस्तकात मांडण्यात आले आहे. हिंदूत्ववादी संघटनांनी यावरच आक्षेप घेतला आहे.