बोअरवेलमधून काढलेल्या बालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 08:30 AM2019-06-12T08:30:14+5:302019-06-12T08:30:21+5:30
दीडशे फूट खोल बोअरवेलमधून (कूपनलिका) बाहेर काढण्यात आलेल्या दोन वर्षांच्या फतेहवीर सिंग या बालकाला वाचविण्यात मात्र यश आले नाही.
संगरूर (पंजाब) : सलग एकशे दहा तास प्रयत्नांची शर्थ करून दीडशे फूट खोल बोअरवेलमधून (कूपनलिका) बाहेर काढण्यात आलेल्या दोन वर्षांच्या फतेहवीर सिंग या बालकाला वाचविण्यात मात्र यश आले नाही. फतेहवीर पुन्हा आपल्या समक्ष खेळेल, बागडेल या आशेने पाच दिवस अहोरात्र वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांना अखेर त्याला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप द्यावा लागला.
भगवानपुरा गावातील त्याच्या घराजवळच असलेल्या बोअरवेलमध्ये तो गुरुवारी सायंकाळी चार वाजता खेळता खेळता पडला. बोअरवेल कापडाने झाकलेले असल्याने तो सात इंच रुंद आणि १५० फूट खोल असलेल्या बोरवेलमध्ये पडला. त्याच्या आईने त्याला वाचविण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले; परंतु तिला यश आले नाही. सोमवारीच फतेहवीर सिंग दोन वर्षांचा झाला होता. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता.
फतेहवीरला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, नागरी प्रशासनाने व्यापक बचाव मोहीम राबविली. त्याच्यापर्यंत प्राणवायूचा पुरवठा करण्यात बचाव पथकाला यश आले होते; परंतु अन्न-पाणी पोहोचू शकले नाही. त्याला वाचविण्यासाठी बोअरवेलच्या समांतर दुसरा बोअरवेल खोदण्यात आला होता. सलग पाच दिवस बचावकार्य सुरू होते. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून त्याच्या कुटुंबियांना धीर दिला. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल, सुखबीर सिंह बादल, आदींनी फतेहवीरच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले.हॉस्पिटलबाहेर जमलेल्या संतप्त गावकºयांनी बचाव कार्य उशिरा सुरू करण्यात आल्याचा प्रशासनावर आरोप केला.
>अथक केलेले बचाव कार्य अपयशी
मंगळवारी सकाळी साडेपाच वाजता राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या बचाव पथकाने या बालकाला बाहेर काढल्यानंतर त्याला डॉक्टर आणि जीवनरक्षक कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रसज्ज रुग्णवाहिकेतून तातडीने १३० किलोमीटर दूर असलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेत (पीजीआयएमईआर) नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालानुसार काही दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पीजीआयएमईआर येथून त्याचा मृतदेह हेलिकॉप्टरने गावी आणण्यात आल्यानंतर गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.