गुजरातमध्ये मारहाणीत दलित युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:41 AM2018-05-22T00:41:26+5:302018-05-22T00:41:26+5:30
कंबरेला बांधून मारले; पाच अटकेत
राजकोट : गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील शापर शहरात रविवारी चोरीच्या संशयावरून कचरा वेचणाऱ्या एका दलित युवकाचा काही जणांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
ठार झालेल्या युवकाचे नाव मुकेश वानिया (वय ३५) आहे. त्याला दोघे मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले. मुकेशच्या कंबरेला दोरीने बांधून एका माणसाने जखडून धरले आहे व दुसरा माणूस त्याला काठीने मारहाण करत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. पोलीस अधीक्षक श्रुती मेहता यांनी सांगितले की, शापरमधील गुजरात औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात कंपनीच्या कंपाऊंडमध्ये कचरा वेचण्यास गेलेल्या मुकेश व त्याची पत्नी जयाबेनवर ते चोरीसाठी आल्याचा संशय मालकाला आला. त्यावेळी काही लोकांनी मुकेशला जबरदस्त मारहाण केली. त्याचे राजकोटमधील रुग्णालयात निधन झाले. (वृत्तसंस्था)
दलितांवर सर्वात जास्त अत्याचार मध्य प्रदेशमध्ये होतात. गुजरातचा देशात
पाचवा क्रमांक लागतो. २०१६च्या आकडेवारीनुसार देशातील एकुण गुन्हेगारीच्या टक्केवारीपैैकी २०% प्रकरणे दलितांवरील अत्याचारांची
होती मात्र गुजरातमध्ये हेच प्रमाण ३२.५% होते. दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणांतील आरोपींना शिक्षा झाल्याचे प्रमाण गुजरातमध्ये फक्त ४.७%च आहे.
मुकेश वानियाची पत्नी जयाबेन हिने शापर-वेरावळ पोलीस ठाण्यात रविवारी संध्याकाळी तक्रार दाखल केली. पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. त्यापैैकी चार जणांची नावे चिराग पटेल, दिव्येश पटेल, जयसुख राडाडिया व तेजस झाला अशी आहेत.
जयसुख हा राडाडिया इंडस्ट्रीजचा मालक आहे व बाकीचे त्याचे मित्र आहेत. मुकेशला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवानी यांनीही टिष्ट्वटरवर जारी केला असून या राज्यामध्ये दलित सुरक्षित नाही अशी टीका केली आहे.