गरबा बघायला आला म्हणून केलेल्या मारहाणीत गुजरातमध्ये दलित तरूणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 11:24 AM2017-10-02T11:24:14+5:302017-10-02T11:27:04+5:30
पटेल समाजाच्या तरूणांनी या दलित युवकाला गरबा पाहण्यापासून हटकले आणि मारहाण केली असा आरोप असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गांधीनगर - गुजरातमधल्या आणंद जिल्ह्यामध्ये गरबा बघायला आले म्हणून एका दलित युवकाला मारहाण करून त्याची हत्या केल्याचे वृत्त आहे. पटेल समाजाच्या तरूणांनी या दलित युवकाला गरबा पाहण्यापासून हटकले आणि मारहाण केली असा आरोप असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रविवारी हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. जयेश सोळंकी हा युवक आपला भाऊ व मित्रांसह एका मंदीराजवळ गरबा बघण्यासाठी आला होता. यावेळी एक तरूण आला आणि त्यानं जातिविषयक आक्षेपार्ह शिवीगाळ जयेशला केली. पटेल समाजाच्या या तरुणाने नंतर आणखी काही जणांना बोलावले.
दलितांना गरबा बघण्याचा अधिकार नसल्याचे सांगत त्यांच्याविरुद्ध पुन्हा जातीविषयक गरळ ओकण्यात आली.
यावेळी या तरुणांनी जयेशला मारहाणही केली, त्याचे डोके भिंतीवर आपटले. जयेशला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, परंतु तिथेच नंतर त्याचा मृत्यू झाला. हा पूर्वनियोजित हल्ला नव्हता असे पोलीसांनी सांगितले आहे. सगळ्या आरोपींना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. जयेशमध्ये व आरोपींमध्ये पूर्ववैमनस्यही नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सगळ्या अंगांनी या दुर्घटनेचा विचार करण्यात येत असल्याचे पोलीस म्हणाले.
याआधी केवळ मिशा ठेवल्या म्हणून दोन दलितांना राजपूत समुदायाच्या लोकांनी गांधीनगरमध्ये मारहाण केली होती. याआधी गाईला मारल्याचा चुकीचा आरोप ठेवत चार दलितांना गुजरातमध्ये मारहाण करण्यात आली होती. दलितांचे रक्षण करण्यास गुजरातमधील भाजपा सरकारला अपयश आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.