सीआरपीएफच्या वाहनाखाली चिरडून निदर्शकाचा मृत्यू, संपूर्ण काश्मीर खोऱ्यात अशांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 01:13 AM2018-06-03T01:13:21+5:302018-06-03T01:13:21+5:30
सीआरपीएफच्या वाहनाखाली शुक्रवारी चिरडल्या गेलेल्या तीन निदर्शकांपैकी एकाचा शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाल्याने श्रीनगर व संपूर्ण काश्मीर खो-यातील वातावरण चिघळले असून, सुरक्षा दलांच्या सर्वच वाहनांवर जोरात दगडफेक सुरू आहे.
श्रीनगर : सीआरपीएफच्या वाहनाखाली शुक्रवारी चिरडल्या गेलेल्या तीन निदर्शकांपैकी एकाचा शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाल्याने श्रीनगर व संपूर्ण काश्मीर खो-यातील वातावरण चिघळले असून, सुरक्षा दलांच्या सर्वच वाहनांवर जोरात दगडफेक सुरू आहे. ज्या वाहनाखाली निदर्शक चिरडून मरण पावला, त्याच्या चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बडगाम, श्रीनगर व ब-याच शहरांत अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
श्रीनगरमध्ये काल दुपारपासून वातावरण अशांतच होते. सुरक्षा दलाचे जवान व काही तरुण यांच्यात बाचाबाची झाल्यामुळे ते आणखी चिघळले आणि निदर्शकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली. तिथे बराच मोठा जमाव उभा होता. त्याच वेळी सीआरपीएफचे एक वाहन तिथे आले. निदर्शकांनी ते अडवण्याचा प्रयत्न केला व त्याच्यावर दगडफेकही केली. त्यामुळे वाहनचालकाने जमावातच वाहन घुसवून ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिघे तरुण त्याखाली चिरडले. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या प्रकारामुळे तरुण अधिकच संतापले. आज सकाळी तिघांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच पुन्हा स्थानिक लोक रस्त्यांवर उतरले. श्रीनगरच्या नौहट्टा भागात हा प्रकार घडला.
पोलीस अधिकाºयाने सांगितले की, सीआरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाºयाला ठराविक ठिकाणी सोडून हे वाहन परतत असताना, ते निदर्शकांच्या गर्दीत सापडले. हे वाहन गर्दीत सापडल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. निदर्शक वाहन अडवण्याचा प्रयत्न करीत आहेत आण चालक ते वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे त्यात दिसते. गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्नात तीन जण त्याखाली चिरडले असावेत, असे सांगण्यात आले.
निदर्शकाच्या मृत्यूनंतर सावधगिरीचे उपाय म्हणून पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे. तसेच मोबाइल इंटरनेट सेवा थांबवण्यात आली आहे. श्रीनगर व अन्य शहरांत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दहशती हल्ल्याच्या शक्यतेमुळे संपूर्ण काश्मीर खोºयात एरवीही ठिकठिकाणी तसेच लष्कराच्या कॅम्पवर जवान तैनात करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)
ओमर अब्दुल्ला यांची टीका
रमझानच्या काळात सुरक्षा दले स्वत:हून गोळीबार करणार नाहीत, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आता निदर्शकांना वाहनांखाली चिरडले जात आहे की काय, असा सवालवजा टीका माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.