व्हेंटीलेटर बेड न मिळाल्यानं मृत्यू, आता खासदारांपासून ते मोदींपर्यंत सर्वजण वाहतायेत श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 09:05 AM2021-04-26T09:05:23+5:302021-04-26T09:06:25+5:30
किडनीची समस्या असल्याने पंडित मिश्र यांचे डायलिसीस करण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले.
वाराणसी - पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचं ह्दयविकाराच्या झटक्याने रविवारी निधन झालं आहे. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एका हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. दुपारी त्यांना ह्दयसंदर्भातील समस्येमुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांना अपयश आलं आणि राजन मिश्रा यांचा प्राणज्योत मालावली. मात्र, वेळेवर त्यांच्यासाठी व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.
किडनीची समस्या असल्याने पंडित मिश्र यांचे डायलिसीस करण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. पण, तेथे त्यांना व्हेंटीलेटर बेड उपलब्ध झाला नाही. येथील सहाही व्हेंटिलेटर बेडवर अगोदरच रुग्ण होते. त्यामुळे, डॉक्टरांच्या सांगण्यावरुन नातेवाईकांनी इतर रुग्णालयात व्हेंटीलेटर बेडसाठी चौकशी केली. तसेच, सोशल मीडियावरुनही मदतीचे याचना करण्यात आली.
दरम्यान, नातेवाईकांनी सर गंगाराम हॉस्पीटलचे चेअरमन डी. एस. राणा यांच्याशी संवाद साधला. त्यांनी एक व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था केली. मात्र, पंडिजींची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे, त्यांना इतरत्र हलवणे योग्य नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, रात्री उशीरा व्हेंटीलेटरची व्यवस्था होत होती. पण, तत्पूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे, समाज माध्यमांवरही पंडिज मिश्र यांच्या निधनानंतर संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे खासदार, मंत्र्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांना पंडित मिश्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
कोण होते राजन मिश्रा?
राजन मिश्रा भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. २००७ मध्ये भारत सरकारकडून कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्कारनं गौरवण्यात आलं. बनारस घराण्याशी ते संबंधित होते. १९७८ मध्ये श्रीलंकेत त्यांनी पहिला संगीत कार्यक्रम केला होता. त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, स्विझरलँड, ऑस्ट्रिया, संयुक्त राज्य अमेरिका, ब्रिटेन, यूएसएसआर, कतार, बांगलादेशसह अनेक देशात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.
संगीत क्षेत्रातील गुरूतुल्य
पं. राजन मिश्रा (वय ७०) यांच्या संगीत क्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व गमावले अशी भावना कलाकारांकडून व्यक्त करण्यात आली. पं. राजन-साजन मिश्रा यांचे पुण्याशी अतूट नाते आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवापासून अनेक स्वरमहोत्सवात कला सादर करून त्यांनी रसिकांना श्रवणानंद दिलाय. ‘लोकमत ’च्या २०१६ मधील ‘दिवाळी पहाट’मध्ये देखील पं. राजन-साजन मिश्रा यांची ‘स्वरमैफल’ रंगली होती. भारत सरकारच्या वतीने त्यांना ‘पद्मभूषण’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.