पीडितेच्या वडिलांचा मृत्यू जंतूसंसर्गाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 04:39 AM2018-04-11T04:39:19+5:302018-04-11T04:39:19+5:30
उत्तर प्रदेशातील उनाव जिल्ह्यातल्या बलात्कारित युवतीच्या वडिलांचा मृत्यू मोठ्या आतड्यात जंतूसंसर्ग होऊन तो संपूर्ण शरीरभर पसरल्याने ओढविला, असा निष्कर्ष उत्तरीय तपासणी अहवालात काढण्यात आला आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशातील उनाव जिल्ह्यातल्या बलात्कारित युवतीच्या वडिलांचा मृत्यू मोठ्या आतड्यात जंतूसंसर्ग होऊन तो संपूर्ण शरीरभर पसरल्याने ओढविला, असा निष्कर्ष उत्तरीय तपासणी अहवालात काढण्यात आला आहे.
भाजपा आमदार कुलदीपसिंग सेनगर व त्यांच्या साथीदारांनी बलात्कार केल्याचा आरोप या युवतीने केला होता. युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु उनाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मरण पावले. (वृत्तसंस्था)
>भाजपा आमदाराच्या भावाला अटक
युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर यांचा भाऊ अतुलसिंग सेनगर याला उनाव येथून लखनऊ क्राइम ब्रँचने अटक केली आहे. कुलदीपसिंग व अतुलसिंग या दोघांनी युवतीच्या वडिलांना आठवडाभरापूर्वी मारहाण केल्याचीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात युवतीने पत्रकारांना सांगितले की, दोन्ही भावांनी माझ्या आयुष्याचे मातेरे केले आहे. दोन्ही भावांना अटक झाली पाहिजे.
>विशेष तपास पथकाकडून चौकशी
युवतीवर झालेला बलात्कार तसेच तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत असताना झालेला मृत्यू या दोन्ही प्रकरणांच्या चौकशीसाठी पोलिसांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान, बलात्कार प्रकरणी आपल्यावर होत असलेले आरोप निराधार आहेत, असे भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर यांनी म्हटले आहे.
आयोगाची सरकारला नोटीस
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने यूपी सरकार आणि राज्याच्या पोलीसप्रमुखांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा चोवीस तासांत अहवाल देण्याचे त्यांना सांगण्यात आले असून, पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही दिले आहेत.