मेजर कुगजीपुढे मृत्यूनेही टेकले गुडघे
By Admin | Published: January 28, 2017 11:44 PM2017-01-28T23:44:08+5:302017-01-28T23:44:08+5:30
काश्मीरच्या सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस उणे ४५ तापमानात २५ फूट बफार्खाली गाडल्या गेल्यानंतरही मृत्यूशी झुंज देत सहा दिवसांनी बाहेर आलेल्या जिगरबाज लान्सनायक हनुमंतप्पा
नवी दिल्ली : काश्मीरच्या सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस उणे ४५ तापमानात २५ फूट बफार्खाली गाडल्या गेल्यानंतरही मृत्यूशी झुंज देत सहा दिवसांनी बाहेर आलेल्या जिगरबाज लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पड याची कहाणी सर्वांना माहीत आहेच. त्यांची आठवण पुन्हा बेळगावमधील मेजर श्रीहरी कुगजी यांच्या अशाच झुंजीमुळे होत आहे. बफार्खाली १५ फूट खोल अडकलेल्या कुगजी यांनी कुलुपाने बर्फ फोडून मृत्यूवरही मात केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील सोनमर्गमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड हिमवृष्टी होत आहे. मेजर श्रीहरी कुगजी याच भागात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी हिमस्खलनामुळे छावणीचे छप्पर कोसळले आणि ते १५ फूट बफार्खाली अडकले. सुटकेचा मार्गच दिसत नव्हता. ते अशा ठिकाणी होते की बचाव पथकाच्या दृष्टीस पडणेही अशक्य होते. पण जिगरबाज मेजर कुगजी यांनी हार मानली नाही. ते बाहेर येण्यासाठी झगडत राहिले आणि त्यात यशस्वीही झाले.
बर्फ फोडण्यासाठी काही हाती लागते का, हे शोधण्याचे त्यांनी
प्रयत्न सुरू केले. तेव्हाच त्यांच्या
हाती ट्रंकचे कुलूप लागलं. ते हाती लागताच त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्यांनी त्या कुलुपाने बर्फ फोडण्यास सुरुवात केली. हळुहळू त्यांचे
एकेक बोट बफार्बाहेर येऊ लागलं. साधारण तीन तास ते झगडत होते. त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळाली आणि बचाव पथकाला कुगजी यांची बोटे दिसू लागली. त्यानंतर सहकारी जवानांनी बर्फ फोडून त्यांना बाहेर काढले. मेजर कुगजी यांच्या या जिद्दीपुढे मृत्यूला गुडघेच टेकावे लागले.
मेजर श्रीहरी कुगजी अद्याप सोनमर्गमध्येच आहेत. रस्त्यावर चार फूट बफार्चा थर असल्याने वाहतूक पूर्णत: बंद आहे आणि हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टरही तिथे पोहोचू शकत नाही. परंतु, त्यांचा पराक्रम बेळगावपर्यंत पोहोचला असून या धाडसाला सगळेच सलाम करत आहेत. (वृत्तसंस्था)