बाबरी वादातील शेवटच्या पक्षकाराचे निधन
By admin | Published: July 21, 2016 04:54 AM2016-07-21T04:54:21+5:302016-07-21T04:54:21+5:30
अयोध्येतील बाबरी मशिद-राम मंदिरावरून गेली ५६ वर्षे सुरु असलेल्या न्यायालयीन वादात मूळ दावा दाखल करणाऱ्या सुरुवातीच्या पक्षकारांपैकी हयात असलेले शेवटचे पक्षकार हाशिम अन्सारी यांचे बुधवारी निधन
लखनऊ : अयोध्येतील बाबरी मशिद-राम मंदिरावरून गेली ५६ वर्षे सुरु असलेल्या न्यायालयीन वादात मूळ दावा दाखल करणाऱ्या सुरुवातीच्या पक्षकारांपैकी हयात असलेले शेवटचे पक्षकार हाशिम अन्सारी यांचे बुधवारी निधन झाले. अन्सारी ९५ वर्षांचे होते.
अन्सारी वृद्धत्वाशी संबंधित व्याधींनी गेले अनेक दिवस अंथरुणाला खिळून होते. बुधवारी पहाटे ५ च्या सुमारास अयोध्या येथील राहत्या घरात ते अल्लाला प्यारे झाले, असे इक्बाल या त्यांच्या मुलाने सांगितले. अब्बाजी नसले तरी त्यांनी सुरू केलेला न्यायालयीन लढा आपण पुढे चालवू, असे इक्बालने स्पष्ट केले.
सन १९४९ मध्ये बाबरी मशिदीत भगवान श्री रामाची मूर्ती कथितपणे गुपचूप आणून ठेवण्यावरून निर्माण झालेल्या अशांततेच्या संदर्भात अन्सारी यांना अटक झाली आणि ते या वादाशी कायमचे जोडले गेले. वादग्रस्त बाबरी मशिदीतून अजान दिल्याबद्दल फैजाबाद न्यायालयाने १९५२ मध्ये त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षाही सुनावली होती.
आज उध्वस्त केली गेलेली बाबरी मशिद जेथे उभी होती व ज्याला हिंदू श्री रामाचे जन्मस्थान मानतात ती जागा मुस्लिमांची आहे की हिंदूंची याविषयीचा मूळ दिवाणी दावा सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डातर्फे ज्या सहा पक्षकारांनी १९६१ मध्ये फैजाबादच्या न्यायालयात दाखल केला. त्यात अन्सारी एक होते. या दाव्यात वादग्रस्त जागेची हिंदू व मुस्लिमांमध्ये वाटणी करण्याचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. त्याविरुद्धची अपिले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. (वृत्तसंस्था)
हाशिम अन्सारी यांच्या निधनाने प्रलंबित न्यायालयीन प्रकरणावर काहीही परिणाम होणार नाही. दाव्यात नोंदलेले त्यांचे सर्व जाबजबाब व त्यांनी सादर केलेली कागदपत्रे न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत. पण या प्रकरणातील सर्व बारीकसारीक माहिती अगदी सुरुवातीपासून माहीत असलेली व्यक्ती या नात्याने त्यांच्या जाण्याने पक्षकार पक्षाचे त्यादृष्टीने नक्कीच नुकसान झाले आहे.
-झाफरयाब जिलानी, निमंत्रक, बाबरी अॅक्शन कमिटी