बलात्कार करुन हत्या, मृत्युदंडाची शिक्षा रद्द; पुन्हा सुनावणी घ्या: सुप्रीम कोर्टाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 05:44 AM2023-10-22T05:44:07+5:302023-10-22T05:44:25+5:30
त्या व्यक्तीला स्वतःचा बचाव करण्याची पुरेशी संधी दिली गेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तीन महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. या प्रकरणाची सुनावणी घाईत झाली आहे. त्या व्यक्तीला स्वतःचा बचाव करण्याची पुरेशी संधी दिली गेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने या प्रकरणी नव्याने सुनावणी घेण्यास सांगितले.
२०१८ मध्ये आरोपपत्र दाखल झाल्यापासून १५ दिवसांत हा खटला पूर्ण झाला होता. आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले होते. आरोपीला बचावाची संधी न देता खटल्याची सुनावणी घाईघाईने केली आहे, असे न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने म्हटले.
हायकोर्टाच्या निकालाला आव्हान
याचिकाकर्त्याला स्वत:चा बचाव करण्यासाठी पुरेशी संधी देण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. इंदूरच्या कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे उच्च न्यायालयाने समर्थन केले होते. त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.