सनातनला विरोध करणाऱ्यांना मृत्युदंड अन्...! धीरेंद्र शास्त्री यांच्या हिंदू राष्ट्राच्या प्लॅमध्ये काय-काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:57 IST2025-03-27T17:55:46+5:302025-03-27T17:57:21+5:30
धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले, दुबई आणि यूएईमध्ये ज्या पद्धतीने कायदे आहेत, तेथे मुस्लीम धर्माला प्राधान्य दिले जाते. त्याच पद्धतीने, हिंदू राष्ट्रात सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचे आणि संस्कृतीचे पालन करण्याचा अधिकार असेल. पण, प्राधान्य सनातनींनाच असेल.

सनातनला विरोध करणाऱ्यांना मृत्युदंड अन्...! धीरेंद्र शास्त्री यांच्या हिंदू राष्ट्राच्या प्लॅमध्ये काय-काय? जाणून घ्या
बागेश्वर धाम पीठाधीश्वर आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे हिंदू राष्ट्राच्या मोहिमेसंदर्भात सातत्याने बोलत असतात. त्यांचा दरबार जेथे जेथे लागतो तेथे-तेथे ते हिंदू राष्ट्रासंदर्भात आपले विचार व्यक्त करतात. गेल्या तीन दिवसांपासून ते उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हनुमान कथेचे वाचन करत आहेत. दरम्यान त्यांनी, जेव्हा देश हिंदू राष्ट्र होईल, तेव्हा काय होईल? यासंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले, भारत हिंदू राष्ट्र झाल्यानंतर, सनातन धर्माविरोधात बोलणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असेल. दंड प्रक्रिया बदलेल आणि फाशीची शिक्षा होईल. प्रत्येकाला हिंदू राष्ट्रात राहण्याचा अधिकार असेल, मात्र ज्याप्रमाणे मुस्लीम देशांमध्ये मुस्लीम धर्माच्या अनुयायांना प्राधान्य दिले जाते, त्याचप्रमाणे हिंदू राष्ट्रात सनातन समाजाला प्राधान्य असेल. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा असेल.
धीरेंद्र शास्त्री म्हणाले, "देश संविधान, हनुमान आणि सनातन यांच्या माध्यमाने चालवला जाईल. केवळ सनातन धर्मच आपल्याला तिसऱ्या महायुद्धापासून वाचवू शकतो. देशाचे विभाजन करू इच्छिणाऱ्यांपासून आपण सावध रहायला हवे. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळेल. हिंदू राष्ट्रात जातीभेदावर राजकारण होणार नाही. हिंदू राष्ट्र झाल्यानंतर कोणीही हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही.
धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले, दुबई आणि यूएईमध्ये ज्या पद्धतीने कायदे आहेत, तेथे मुस्लीम धर्माला प्राधान्य दिले जाते. त्याच पद्धतीने, हिंदू राष्ट्रात सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचे आणि संस्कृतीचे पालन करण्याचा अधिकार असेल. पण, प्राधान्य सनातनींनाच असेल. यावेळी त्यांनी, हिंदू राष्ट्रासाठी दिल्ली ते वृंदावन, अशी पदयात्रा काढण्याची घोषणाही केली.
हिंदूंना जागृत करण्यासाठी आपण दिल्ली ते वृंदावन, अशी दुसरी यात्रा काढू. सरकार घोषणा देते, 'बच्चे दो अच्छे' मग 'चच्ची के 30 बच्चे क्यों?' असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. एवढेच नाही तर, हिंदूंच्या मुलांची क्वांटिटी कमी असली तरी, ते त्यांची क्वालिटी चांगली असावी. मुले चारच असावीत पण कट्टर हिंदू असावीत. मानवांत मानवता यावी, यासाठी क्रांती घडवू, असेही धीरेंद्र शासंत्री म्हणाले.