सात लोकांना जिवंत जाळणा-याला मिळणार फाशीच, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 04:04 PM2018-06-03T16:04:50+5:302018-06-03T16:13:14+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकाच कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळणा-या व्यक्तीच्या दयेचा अर्ज फेटाळून लावला आहे.
नवी दिल्ली- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकाच कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळणा-या व्यक्तीच्या दयेचा अर्ज फेटाळून लावला आहे. राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर कोविंद यांच्याकडे पहिल्यांदाच दयेची याचिका दाखल करण्यात आली होती. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील राघोपूर प्रखंड येथे ही क्रूर घटना 2006 रोजी घडली होती. ज्यात जगत राय नावाच्या नराधमानं म्हशींची चोरी केल्याच्या प्रकरणात विजेंद्र महतो आणि त्याच्या कुटुंबातील 6 जणांना जिवंत जाळलं होतं.
महतो यानं सप्टेंबर 2005मध्ये म्हशींची चोरी झाल्याचा एक गुन्हा दाखल केला होता. ज्यात जगत राय, वजीर राय आणि अजय राय यांना आरोपी करण्यात आलं होतं. या आरोपींनी महतोवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणला होता. परंतु महतो यांनी गुन्हा काही मागे घेतला नाही. अखेर जगत रायनं महतोचं घर पेटवून दिलं. त्यात महतोची पत्नी आणि पाच मुलांचा भाजून मृत्यू झाला. आगीत होरपळल्यामुळे महतोंचाही काही महिन्यांनी मृत्यू झाला.
या जळीत कांडात राय याला दोषी ठरवत स्थानिक न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर उच्च न्यायालयानं सुनावलेली ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवली. अखेर राय यानं यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेसाठी याचिका दाखल केली. परंतु कोविंद यांनी ती याचिका फेटाळून लावली. राष्ट्रपती कार्यालयानं याबाबत गृह मंत्रालयाशीही विचारविनिमय केला. त्यानंतर रामनाथ कोविंद यांनी हा निर्णय घेतला.