बलात्कारप्रकरणी ५० दिवसांत फाशीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 02:17 AM2019-08-09T02:17:34+5:302019-08-09T02:17:47+5:30
दुर्दैवी बाळ होते नऊ महिन्यांची मुलगी; अत्याचारानंतर केली होती हत्या
वरंगल : तेलंगण राज्यात नऊ महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारणाऱ्या प्रवीण (२८) याला फक्त ५० दिवसांत वरंगल जिल्हा पहिल्या अतिरिक्त न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली.
१९ जून, २०१९ रोजी प्रवीण वरंगलच्या शेजारी असलेल्या हणमकोंडा गावातील घरात गेला होता. याच घरात त्या दुर्देवी मुलीचे कुटुंब झोपेत होते. त्याने त्या मुलीला उचलले. तिच्यावर अत्याचार करून मारून टाकले. त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला गावकऱ्यांनी पकडले व त्याच्याकडे मुलगी असल्याचे पाहिल्यावर त्याला जबर मारहाण केली. बाळाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ती मृत असल्याचे जाहीर केले गेले.
या मुलीवरील संतापजनक बलात्कार व हत्येच्या प्रकाराने संपूर्ण राज्यात उद्रेक निर्माण झाला. स्थानिक पोलिसांनी लवकरच या प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजचा आधार घेऊन आरोपपत्र दाखल केले. दरम्यान, वरंगलच्या वकिलांनी आरोपी प्रवीणची बाजू मांडायला नकार दिला होता. (वृत्तसंस्था)
तेव्हाच आम्हाला समाधान लाभेल
‘प्रवीणला जी शिक्षा सुनावली गेली त्यानुसार त्याला फाशी दिली जाईल तेव्हाच आम्हाला समाधान लाभेल’, असे मुलीच्या पालकांनी म्हटले आहे.
सीसीटीव्ही निर्णायक
या घटनेत सीसीटीव्ही कॅमेºयाने निर्णायक भूमिका बजावल्याचे पोलिसांनी सांगितले. आमच्या तुकडीने सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज मिळवले आणि हा आरोपी तेथे होता आणि तो पळून जायच्या प्रयत्नात असताना त्याला स्थानिक रहिवाशांनी पकडले, असे वरंलगचे पोलीस आयुक्त डॉ. विश्वनाथ रविंदर यांनी सांगितले.