याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला
By admin | Published: July 29, 2015 04:13 PM2015-07-29T16:13:36+5:302015-07-29T23:17:59+5:30
मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटप्रकरणातील याकूब मेमनचा दयेचा अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाऴला आहे. त्यामुळे आता टाडा कोर्टाने काढलेल्या डेथ वॉरंटनुसार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली/मुंबई, दि.२९ - मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटप्रकरणातील याकूब मेमनचा दयेचा अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाऴला आहे. त्यामुळे आता टाडा कोर्टाने काढलेल्या डेथ वॉरंटनुसार याकूब मेमनला उद्या सकाळी सात वाजता नागपूरच्या जेलमध्ये फाशी देण्यात येणार आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने याप्रकरणात सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन झाले असल्याचे सांगत याकूब मेमनची फेरविचार याचिका फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाच्या निकालापाठोपाठ महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनीदेखील याकूबचा दयेचा अर्ज फेटाळल्याने याकूबला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे उद्या सकाळीच याकूबला फाशी होईल अशी शक्यता असून राष्ट्रपती दयेच्या अर्जावर काय भूमिका घेतात हाच एक प्रश्न आहे. जर राष्ट्रपतींनी फाशी थांबवली नाही तर उद्या सकाळी सात वाजता नागपूर जेलमध्ये याकूबला फाशी देण्यात येणार आहे. तुरुंगप्रशासनाने ठरल्याप्रमाणे फाशीची संपूर्ण तयारी केली आहे.
कायद्याने दिलेले सगळे अधिकार आपल्याला वापरता आले नसून त्याआधीच टाडा कोर्टाने डेथ वॉरंट काढल्याचे सांगत हे कायदेशीर प्रक्रियेला बगल देत झाल्याची याचिका मुंबई बाँबहल्ल्यातील प्रमुख आरोपी याकूब मेमनने केली होती. तसेच याकूबने सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या निकालावर फेरविचार याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने याकूबची फेरविचार याचिका फेटाळली आहे तसेच डेथ वॉरंट काढताना कुठल्याही प्रकारे कायदेशीर प्रक्रियेला फाटा दिला गेलेला नाही असेही स्पष्ट केले. त्याचप्रमाणे उद्या ३० जुलै रोजी त्याच्या फाशीची अमलबजावणी करण्यासही आडकाठीही केलेली नाही.
अर्थात, याकूबने राज्यपाल तसेच राष्ट्रपती अशा दोघांकडे दयेचा अर्ज केला असून त्यापैकी महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी दयेचा अर्ज फेटाळला आहे. आता राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडे करण्यात आलेल्या अर्जासंदर्भात काय निर्णय घेतला जातो, जर आज मुखर्जींनी काहीच निर्णय दिला नाही तर फाशी स्थगित होते का आदी प्रश्न निर्माण झाले आहेत.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकऱणी याकूब मेमनला २००७ मध्ये टाडा कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हे प्रकरण वरच्या न्यायालयांमध्ये जात अखेर सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टानेही याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, या विरोधात याकूब मेमनने सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. मंगळवारी दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने या प्रकरणाची सुनावणी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार आज बुधवारी सकाळपासून तीन न्यायाधीशांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. कोर्टाने नियमानुसार सर्व प्रक्रिया पार पडल्याचे स्पष्ट केले आहे. फाशीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला असून सुप्रीम कोर्टाच्या दृष्टीने उद्या याकूबला फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.