निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीच
By admin | Published: May 6, 2017 04:42 AM2017-05-06T04:42:11+5:302017-05-06T04:42:11+5:30
संपूर्ण देशवासीयांमध्ये संताप निर्माण करणाऱ्या निर्भयावरील सामूहिक बलात्कार आणि तिची क्रूरपणे हत्या झाल्याच्या प्रकरणी चारही
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संपूर्ण देशवासीयांमध्ये संताप निर्माण करणाऱ्या निर्भयावरील सामूहिक बलात्कार आणि तिची क्रूरपणे हत्या झाल्याच्या प्रकरणी चारही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. निकालानंतर निर्भयाच्या आईने अखेर न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया दिली, तर तिच्या वडिलांनी ‘चौघा क्रूरकर्म्यांना फासावर चढविल्यानंतरच खरा न्याय मिळेल,’ असे सांगितले. न्यायालयाच्या निकालाचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
१६ डिसेंबर, २०१२ च्या रात्री ही दुर्दैवी आणि अत्यंत लज्जीत करणारी घटना घडली होती. शिक्षेवर शिक्कामोर्तब करताना, न्यायमूर्ती दीपक मिश्रा, आर. भानुमती आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने म्हटले की, या घटनेने संपूर्ण देशभर संतापाची त्सुनामी निर्माण झाली व तो बलात्कार आणि हत्या ही अत्यंत क्रूर व दुर्मीळातील दुर्मीळ घटना होती. जिल्हा न्यायालयाने चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. हा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानेही कायम ठेवला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठानेही योग्य ठरवले.
या चार निर्दयी आरोपींना शिक्षा
मुकेश सिंह (२९), पवन गुप्ता (२२), विनय शर्मा (२३) आणि अक्षयकुमार सिंह या दोषींना फाशी दिली जाईल. या खटल्यातील आणखी एक आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली, तर आणखी एक अल्पवयीन आरोपीला सुधारगृहात तीन वर्षे ठेवण्याची शिक्षा सुनावली गेली होती.
टाळ््या वाजवून स्वागत : सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी निकाल देताच कोर्टात उपस्थित असलेली निर्भयाची आई आशा देवी यांनी टाळ््या वाजवून निकालाचे स्वागत केले.
आज तुला न्याय मिळणार...
दुपारी जवळपास १ वाजून १५ मिनिटांनी निर्भयाचे आईवडील कोर्टातील मागील आसनावर येऊन बसले. शुक्रवारी प्रकरणाचा निकाल लागणार असल्याची माहिती निर्भयाच्या आईला गुरुवारी मिळाली. त्यामुळे गुरुवारी रात्रभर त्या झोपूही शकल्या नाहीत. सकाळी मुलीच्या फोटोकडे पाहून त्या निर्भयाला म्हणाल्या, "आज तुला सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळणार."
ती असती तर...
जेव्हा ही दुर्दैवी घटना घडली, तेव्हा निर्भया २३ वर्षांची होती. आज ती हयात असती, तर तिचे मेडिकल क्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाले असते किंवा कदाचित तिचे लग्नदेखील झाले असते, असे सांगताना निर्भयाची आई भावुक झाली.
निकालाने मी आनंदी, देशही आनंदी
अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांना कठोरपणे प्रतिबंध करणारा हा निकाल आहे, असे केंद्रीय मंत्री मनेका गांधी म्हणाल्या. न्यायालयाचा असा निकाल समाजात, असे गुन्हे करणाऱ्यांना व भविष्यातील अपराध्यांपर्यंत (विशेषत: अल्पवयीन) कठोर संदेश पोहोचवण्यासाठी आवश्यक होता, असेही त्यांनी सांगितले.
महिला आयोगाकडून निकालाचे स्वागत
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती जयहिंद यांनी स्वागत केले. त्या म्हणाल्या, या निकालाने बलात्कार करणाऱ्यांमध्ये कठोर संदेश पोहोचेल. न्यायाला उशीर झाला, तरी तो नाकारला गेलेला नाही. निर्भयावर बलात्कार करणारे आता फासावर जातील, असे टिष्ट्वट स्वाती जयहिंद यांनी केले आहे.
निकाल लागण्यास विलंब झाला असला, तरी आमच्या मुलीला न्याय मिळाला आहे. केवळ माझ्या मुलीलाच नाही, तर संपूर्ण देशाला न्याय मिळाला आहे. - निर्भयाची आई
चारही दोषींना फाशीची शिक्षा गरजेची होती. त्यामुळे समाजात योग्य संदेश पोहोचण्यास मदत होईल. चारही आरोपींना फासावर चढविल्यानंतरच समाधान मिळेल.
- निर्भयाचे वडील