केश प्रत्यारोपणानंतर विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Published: June 10, 2016 04:08 AM2016-06-10T04:08:54+5:302016-06-10T04:08:54+5:30
२२ वर्षीय संतोषचा केश प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर (हेअर ट्रान्सप्लान्ट) दोनच दिवसांत मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
चेन्नई : वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी २२ वर्षीय संतोषचा केश प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर (हेअर ट्रान्सप्लान्ट) दोनच दिवसांत मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात त्याच्यावर एका स्थानिक हेअर ट्रान्सप्लान्ट सेंटरमध्ये केश प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर तापामुळे गुंतागुंत निर्माण होऊन मृत्यू ओढावला.
त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर सर्जन नसल्याचा आरोप करीत त्याच्या पालकांनी अटकेची मागणी केल्यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत या केंद्राला सील ठोकले आहे. या केंद्रातील दोन डॉक्टर पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
आपल्या डोक्यावर थोडे टक्कल असल्यामुळे संतोषला मित्रांमध्ये वावरताना लाज वाटायची. त्यामुळे त्याने केस येण्यासाठी शस्त्रक्रिया करवून घेतली.
त्याच्या डोक्यावर १२०० केस प्रत्यारोपित करण्यासाठी दहा तासांची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला अचानक ताप आला. त्यानंतर, त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, दोनच दिवसांत त्याच्यावर मृत्यूने झडप घातली.
मुलाचा मृत्यू हताशपणे पाहण्याची वेळ आलेली त्याची आई पी. जोसेफिन या परिचारिका असून, संतोष हा त्यांचा एकुलता एक
मुलगा होता. भूलतज्ज्ञ
(अॅनेस्थेटिस्ट) शस्त्रक्रिया सुरू होण्यापूर्वी इंजेक्शन देऊन निघून गेला. संतोषच्या हेअर ट्रान्सप्लांटसाठी डॉक्टरांनी तब्बल ७३ हजार रुपये घेतले होते. (वृत्तसंस्था)
>मुदत संपलेला सलूनचा परवाना...
पसार झालेल्या डॉक्टरांनी हेअर ट्रान्सप्लान्ट सेंटरसाठी नव्हे, तर सलूनसाठी परवाना घेतला होता. तो परवानाही दोन महिन्यांपूर्वीच संपला होता. दोन्ही डॉक्टरांकडे वैद्यकीय पदवी असून, एकाने चीनमधून प्रशिक्षण घेतले असले, तरी त्यांच्याकडे रुग्णाच्या शरीरात गुंतागुंत निर्माण झाल्यास इलाजासाठी पायाभूत सुविधा नव्हत्या.आॅपरेशन थिएटरमध्ये निर्जंतूक अशी जागाही नव्हती, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तपासाअंती म्हटले आहे. हेअर ट्रान्सप्लान्ट सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा आढळून आला. मात्र, त्यासाठी आवश्यक परवाना नसल्याची माहिती औषध नियंत्रकाने दिली आहे.बेपत्ता झालेले दोन डॉक्टर नियमितपणे ५० ते ६० लाख रुपयांची कमाई करतात. त्यांच्यासाठी केवळ पैसा महत्त्वाचा असून, एखाद्याच्या जिवाची काहीही किंमत नाही. अवघ्या काही तासांत मी माझा मुलगा गमावला. ते इतरांबाबत घडू नये. आम्हाला तर न्याय हवाच आहे.
- जोसेफिन,
मृत संतोषची आई