तीन अतिरेक्यांचा खात्मा

By admin | Published: June 23, 2017 12:26 AM2017-06-23T00:26:08+5:302017-06-23T00:26:08+5:30

जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सहा तासांच्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

Death of three terrorists | तीन अतिरेक्यांचा खात्मा

तीन अतिरेक्यांचा खात्मा

Next

पुलवामा : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सहा तासांच्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. चकमकीनंतर स्थानिकांचा जमाव सुरक्षा दलांच्या दिशेने चाल करून येत होता. त्याला पांगविण्यासाठी केलेल्या कारवाईत एक नागरिकही ठार झाला. तौसिफ हसन वनी (२८) असे त्याचे नाव असून सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यात तो नेहमीच पुढे असायचा, असे पोलिसांनी सांगितले. वनीविरुद्ध १० गुन्हे दाखल आहेत. २०१० आणि २०१६ मध्ये जनसुरक्षा कायद्याखालीही त्याला अटक करण्यात आली होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
काकापोरा भागातील एका घरात माजिद मीरसह तीन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी त्या घराला वेढा घातला. सुरक्षा दले आणि अतिरेक्यांत रात्री दहा वाजता चकमक सुरू झाली. मीरशिवाय शाहिद आणि इर्शाद अहमद या दोन दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर पहाटे चार वाजता ती संपुष्टात आली. मीरने २०१६ मध्ये या दोघांची लष्कर-ए-तोयबात भरती केली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दहशतवादी लपून बसलेल्या घराला चकमकीदरम्यान आग लागली. आगीपासून वाचण्यासाठी दहशतवाद्यांना घराबाहेर पडावे लागले. पोलिसांनी त्यांना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यामुळे जवानांनी त्यांना गोळ्या घातल्या.
पुलवामाच्या या भागातील अलीकडची ही पहिलीच यशस्वी मोहीम आहे. दहशतवाद्यांचे येथे मोठे जाळे असून, स्थानिकांचाही त्यांना मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून सुरक्षा दलांना येथे यश मिळत नव्हते. आजच्या मोहिमेमुळे लष्कर-ए-तोयबाला मोठा धक्का बसला आहे.
अनंतनाग जिल्ह्याच्या अर्विन गावात १७ जून रोजीच्या चकमकीत लष्करचा स्वयंघोषित कमांडर जुनैद मट्टू आणि अन्य दोघे ठार झाले होते. चकमकीनंतर पोलिसांना आणखी एक लढाई लढावी लागली आणि यावेळी आव्हान होते रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांचे. निदर्शक सुरक्षा
दलांच्या दिशेने दगडफेक करीत
होते. पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासह पेलेट गनचा वापर केला. त्यात वनीचा मृत्यू झाला, तर अन्य ४० लोक जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.

मीरचा काकापोराचे माजी सरपंच फयाज अहमद आणि पीडीपीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल गनी दार यांच्या हत्येत कथितरीत्या हात होता. खोऱ्यातील तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादाच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.
लष्करच्या काश्मिरातील कारवायांचे संचालन करणारा पाकिस्तानी नागरिक अबू दुजाराचा तो निकटवर्तीय मानला जाई. तो दहशतवादी कमांडर होता.

Web Title: Death of three terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.