तीन अतिरेक्यांचा खात्मा
By admin | Published: July 13, 2017 12:20 AM2017-07-13T00:20:24+5:302017-07-13T00:20:24+5:30
अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या गोळीबारानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी कडक बंदोबस्त ठेवला
सुरेश डुग्गर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या गोळीबारानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी कडक बंदोबस्त ठेवला असून, बडगाम जिल्ह्यात बुधवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीमध्ये हिजबुल मुजाहिद्दिनचे तीन दहशतवादी मारले गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तिघांपैकी एका अतिरेक्याचा पोलीस अधिकारी आयुब पंडित यांच्या हत्येत समावेश होता. या घटनेनंतर बडगाममध्ये स्थानिक लोकांनी काश्मीरला स्वातंत्र्य हवे, अशा घोषणा दिल्या.
बडगामच्या रुदवोडा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यामुळे मंगळवारी संध्याकाळपासून सुरक्ष दलांनी नाकेबंदी केली होती. अतिरेक्यांना पळून जाता येऊ नये, अशी व्यवस्थाच करण्यात आली होती. प्रत्येक घरात शिरून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असताना, अचानक सुरक्षा दलांवर गोळीबार झाला. पण अंधारामुळे ते कुठे लपले आहेत, याचा अंदाज घेता आला नाही. रात्रीचा फायदा घेऊन पळून जाण्यासाठी ते अधूनमधून सुरक्षा दलाच्या जवानांच्या दिशेने गोळीबार करीतच होते.
सकाळी पुन्हा दहशतवाद्यांचा बाहेर पळून जाण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या प्रयत्नात त्यांनी पुन्हा गोळीबार करताच, ते नेमके कुठे लपले आहेत, हे जवानांच्या लक्षात आले. त्यानंतर सुरक्षा दलांनीही गोळीबार करून, त्या तिघांचा खातमा केला. ते जिथे लपले होते, तिथे काही शस्त्रे आणि दारूगोळाही सापडला. ते तिघे हिजबुल मुजाहिद्दिनचे असून, मूळचे काश्मीरमधीलच आहेत, असे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
> निर्बंध जारी
त्यातील साजिद गिरकर ठार झाल्याचे कळताच, बडगाम जिल्ह्याच्या मलरट्टा भागात तणाव निर्माण झाला. तिथे हिंसाचार होईल, अशी परिस्थिती होती. तो तेथील रहिवासी असल्याने बडगामच्या पाच पोलीस ठाण्याच्या हद्दींमध्ये पोलिसांनी निर्बंध लागू केले आहेत.
त्याचा मृतदेह नंतर त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्याची दुपारी अंत्ययात्रा निघाली, त्यात हजारो लोक सहभागी झाले होते आणि ते काश्मीरला आझादी (स्वातंत्र्य) मिळाले पाहिजे, अशा घोषणा देत होते. इतर दोघांचे मृतदेहही कुटुंबीयांकडे सोपविण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.