मणिपूर हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या ५४वर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 05:35 AM2023-05-07T05:35:48+5:302023-05-07T05:36:37+5:30
राज्यात शनिवारी जनजीवन पूर्वपदावर आले असून दुकाने व व्यवहार पुन्हा सुरू झाले.
इम्फाळ : मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या ५४वर पोहोचल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. राज्यात शनिवारी जनजीवन पूर्वपदावर आले असून दुकाने व व्यवहार पुन्हा सुरू झाले.
या राज्यातील हिंसाचारग्रस्त भागांमध्ये लष्कर, निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. इम्फाळमध्ये सर्व बाजारपेठा खुल्या झाल्या असून लोकांनी भाजी, धान्य आदी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. ५४ मृतांपैकी १६ जणांचे मृतदेह चुराचंदपूर जिल्हा रुग्णालयातील तर १५ मृतदेह इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या शवागारात ठेवण्यात आली आहेत.
पाच बंडखोर ठार
चुराचंदपूर जिल्ह्यात शुक्रवारी लष्कर व बंडखोरांत झालेल्या चकमकींत ५ बंडखाेर ठार झाले तर सुरक्षा दलाचे २ जवान जखमी झाले.
हिंसाचारग्रस्त भागांमध्ये अडकलेल्या १३ हजार लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चुराचंदपूर, मोरेह, काकचिंग, कांगपोक्पी या हिंसाचारग्रस्त भागांतील परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.