मृत्यूचं तांडव! ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढली; ५६ जणांची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 06:27 PM2023-06-03T18:27:08+5:302023-06-03T18:27:35+5:30
odisha train accident death : ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे.
Balasore Train Accident । ओडिशा : एक वाईट स्वप्न पडावं तशी एक हृदयद्रावक घटना शुक्रवारी ओडिशातील बालासोरा येथे घडली. या रेल्वे दुर्घटनेने सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. लक्षणीय बाब म्हणजे आज दुसऱ्या दिवसाअखेर बचावकार्य सुरू असून मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सकाळी मृत प्रवाशांची संख्या २८० होती, तर आता यामध्ये वाढ झाली आहे.
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी २ वाजेपर्यंत ओडिशा दुर्घटनेत मृत झालेल्यांची संख्या २८८ वर पोहोचली आहे. तर ७४७ लोक जखमी आहेत आणि ५६ जणांची प्रकृती गंभीर आहे.
As of 2pm today, the death toll in #OdishaTrainTragedy has risen to 288 while 747 people have been injured along with 56 grievously injured: Indian Railways#BalasoreTrainAccidentpic.twitter.com/vAZ25o5q6o
— ANI (@ANI) June 3, 2023
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळावर जाऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. याशिवाय मोदींनी रूग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची भेट घेतली. "अपघाताला कारणीभूत असलेल्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल", अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जखमींची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.
"हा मोठा अपघात असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. ओडिशा सरकार आणि येथील अधिकाऱ्यांनी आपल्याकडे ज्या काही सुविधा आहेत, त्यांचा वापर करून जे काही करता येईल ते केलं. जास्तीत जास्त लोकांची मदत कशी करता येईल यासाठी येथील स्थानिकांनी पुढाकार घेतला. रक्तदान असो अथवा बचावकार्य. यामध्ये सहभागी असलेल्या स्थानिक तरूणांचा मी आभारी आहे", असंही मोदींनी सांगितलं.
तरूणाईचा मदतीचा हात
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ओडिशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले आहेत. अशा अपघातांमध्ये जास्त रक्तस्त्राव होऊन जखमींचा मृत्यू होतो. रुग्णालयांना रक्ताची तातडीची गरज आहे. आतापर्यंत २८० हून अधिक लोक मरण पावले आहेत परंतु हा आकडा आणखी पुढे जाऊ नये म्हणूनच लोकांनी आपल्या मित्रांसह रक्त देण्याचे ठरवले.