तोयबाच्या कमांडरसह दोघांचा खात्मा
By admin | Published: July 2, 2017 04:52 AM2017-07-02T04:52:19+5:302017-07-02T04:52:19+5:30
गेल्या महिन्यात सहा पोलिसांना ठार मारणारा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बशीर लश्करी याच्यासह दोन अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी
श्रीनगर : गेल्या महिन्यात सहा पोलिसांना ठार मारणारा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बशीर लश्करी याच्यासह दोन अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी शनिवारी काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात एका आॅपरेशनमध्ये ठार मारले. पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्याच्या दियालगाम भागात बटपोरा गावात या मोहिमेत ताहिरा (४४) आणि शादाब अहमद चोपन (२१) या दोघांचा मृत्यू झाला. पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी सांगितले की, चकमक संपली आहे. बशीर लश्करी आणि आझाद दादा अशी मृत अतिरेक्यांची नावे आहेत.
गावातील एका घरात लपून बसलेला अतिरेकी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत ताहिरा यांचा मृत्यू झाला, तर घटनास्थळी आंदोलकांविरुद्ध सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत चोपन मारला गेल्याचे सांगण्यात आले. चोपन यास एसकेआयएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनास्थळी जखमी झालेल्या चार जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, दक्षिण काश्मीरच्या अचबल भागात १६ जून रोजी पोलीस ठाण्याचे प्रभारी फिरोज अहमद डार आणि अन्य पाच पोलिसांच्या हत्येत लश्करी आणि त्यांचा समूह सहभागी होता.
अनंतनागच्या बटपोरा भागात लश्करीसह अन्य अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने या भागाला घेरले. याचवेळी अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर ही चकमक सुरू झाली. पोलिसांनी सांगितले की, अतिरेक्यांनी १७ जणांचा मानवी ढाल म्हणून उपयोग केला. तथापि, ही मोहीम सुरू होण्यापूर्वी या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
१५ दिवसांतच बदला
बशीर लश्करी हा लष्कर-ए-तोयबाचा खतरनाक अतिरेकी म्हणून ओळखला जात होता. पोलीस अधिकारी फिरोज अहमद डार यांच्यासह सहा पोलिसांना मारणारा अतिरेकी हाच तो बशीर.
जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी त्यावेळीच स्पष्ट केले होते की, शहीद झालेल्या सहा पोलिसांना न्याय मिळवून देऊ. या घटनेला १५ दिवस पूर्ण होत असतानाच शनिवारी सुरक्षा दलाने हे यशस्वी आॅपरेशन करत बशीरचा खात्मा केला. सुरक्षा दलाचे हे यश मानले जाते.