छेडछाडग्रस्त मुलीचा मृत्यू ही तर देवाची इच्छा - पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांची मुक्ताफळे
By admin | Published: May 2, 2015 11:22 AM2015-05-02T11:22:39+5:302015-05-02T19:06:58+5:30
धावत्या बसमधून छेड काढल्यानंतर फेकून देण्यात आल्यानंतर मुलगी मृत्युमुखी पडल्याची घटना म्हणजे देवाची इच्छा असल्याचे वादग्रस्त वक्तव्य पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांनी केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
मोगा ( पंजाब), दि. २ - धावत्या बसमधून छेड काढल्यानंतर फेकून देण्यात आल्यानंतर मुलगी मृत्युमुखी पडल्याप्रकरणी सर्व स्तरातून न्यायाची मागणी होत असतानाच 'ही घटना म्हणजे देवाची इच्छा' असल्याचे वादग्रस्त वक्तव्य पंजाबचे शिक्षणमंत्री सुरजीत सिंह रखरा यांनी केले आहे. रखरा यांच्या वक्तव्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. या घटनेवरून पंजाबमधील बादल सरकारवर टीका होत असतानाच रखरा यांनी ' कोणीही अपघात थांबवू शकत नाही, जे काही होतं ते देवाच्या इच्छेने होत असतं. भविष्यात आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न करू ' असे म्हटले आहे. रखरा यांच्या अशा असंवेदनशील वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
पंजाबमध्ये बुधवारी सायंकाळी ( २९ एप्रिल) मायलेकीला धावत्या बसमध्ये छेडछाड करून नंतर खाली ढकलून देण्यात आल्याची संतप्त घटना घडली होती. यात पीडित तरुणीला आपला जीव गमवावा लागला तर तिची आई जबर जखमी झाली. मोगापासून १० किमी अंतरावर गिल गावाजवळ झालेल्या या अमानुष घटनेचे तीव्र पडसाद लोकसभेसह संपूर्ण देशात उमटले. ही बस पंजाबमधील सत्ताधारी बादल यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची असल्यामुळे विरोधी पक्षांनी निषेधाचे स्वर उंचावले. तर पुरेशी नुकसानभरपाई मिळेपर्यंत आणि संबंधित बस कंपनीचा परवाना रद्द करेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा कुटुंबाने घेतला आहे.