पाकच्या गोळीबारात महिलेचा मृत्यू
By admin | Published: October 8, 2014 11:06 AM2014-10-08T11:06:09+5:302014-10-08T13:42:20+5:30
पाकिस्तानी सैन्याच्या कुरापाती सुरुच असून बुधवारी पहाटे पाक सैन्याने केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ८ - सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या कुरापाती सुरुच असून बुधवारी पहाटे पाक सैन्याने केलेल्या गोळीबारात सांबा सेक्टरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ११ भारतीय नागरिक या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील ५० भारतीय चौक्या व १८ गावांवर पाकिस्तानी रेंजर्सने मंगळवारी रात्री पुन्हा एकदा जोरदार गोळीबार केला. बुधवारी सकाळपर्यंत हा गोळीबार सुरुच होता. भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार या पाक रेंजर्सच्या गोळीबारात २ जवानांसह ११ जण जखमी झाले आहेत. भारतीय सैन्यानेही पाक रेंजर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
१ ऑक्टोबरपासून सीमा रेषेवर पाकने केलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. भारत - पाकमधील तणावामुळे सीमा रेषेवरील गावांमध्ये राहणा-या १६ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर भारताने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानमधील १५ जण ठार झाले आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पाकिस्तानविरोधात नरेंद्र मोदींनी मौन सोडून कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. पाकसोबतची चर्चा थांबवून पाक सैन्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले असून आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्याच्या तिन्ही प्रमुखांसोबत बैठक घेणार असल्याचे समजते.