काश्मीरमध्ये हिजबूल मुजाहिद्दीनचा चीफ कमांडर यासीन इत्तू याचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 10:23 PM2017-08-13T22:23:46+5:302017-08-13T22:24:01+5:30
बुरहान वानी आणि अबू दुजानाला ठार केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराने मोठी कामगिरी केली आहे. जम्मू कश्मीरच्या शोपियान येथे झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने हिजबूल मुजाहिद्दीनचा मुख्य कमांडर यासीन इत्तू याचा खात्मा केला आहे.
श्रीनगर, दि. 13 - बुरहान वानी आणि अबू दुजानाला ठार केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराने मोठी कामगिरी केली आहे. जम्मू कश्मीरच्या शोपियान येथे झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने हिजबूल मुजाहिद्दीनचा मुख्य कमांडर यासीन इत्तू याचा खात्मा केला आहे.जम्मू कश्मीरच्या पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. शोपियानमधील अवनीरा गावात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी यासीन इत्तू याच्यासह 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत 2 भारतीय जवानही शहीद झाले आहेत.
40 वर्षीय यासीन इत्तू हा हिजबूल मुजाहिद्दीनचा मुख्य कमांडर होता. वर्षाभरापूर्वी अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आलं होतं पण नंतर ते वृत्त खोटं ठरलं. हिजबूल मुजाहिद्दीनच्या अनेक व्हिडीओमध्ये इत्तू दिसला होता. 2016मध्ये बुरहान वानी याच्या मृत्यूनंतर अनेक रॅलीमध्ये इत्तू दिसला होता. इत्तू हा बुरहान वानीचा निकटचा साथीदार होता. इत्तू हा महमूद गजनवी या नावाने देखील प्रसिद्ध आहे.
शनिवारी संध्याकाळी या भागात दहशतवादी असल्याची माहिती हाती आली होती. तेव्हापासून शोपियानच्या अवनीरा गावात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरू होती. राज्य पोलीस, सीआरपीएफ आणि ५५ राष्ट्रीय रायफल यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यामध्ये इत्तूव्यतिरिक्त इतर दोन दहशतवाद्याची नावे इरफान-उल-हक शेख आणि माजिद शेख अशी आहेत. हे सर्व दहशतवादी हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधीत आहेत.
बुरहान वानी आणि अबू दुजानाला ठार केल्यानंतरची काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा दलाची ही मोठी कामगिरी मानली जात आहे.