'जे झालं ते पुढे होणार नाही', उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीतील पराभवावर राजनाथ सिंह यांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 09:05 PM2018-03-17T21:05:44+5:302018-03-17T21:05:44+5:30
या पराभवातून भाजपाला धडा मिळाला आहे.
नवी दिल्ली- उत्तर प्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाच्या पराभवावर केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पराभवातून भाजपाला धडा मिळाला आहे. व ते सुधारण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल, असं राजनाथ सिंह यांनी म्हंटलं. 'जे झालं ते पुढे होणार नाही. असंही होऊ शकतं याची आम्हाला कल्पना आली, असं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत भाजपाचा धुव्वा उडाला. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही ठिकाणी समाजवादी पार्टीचा विजय झाला. भाजपाचा बालेकिल्ला उत्तर प्रदेशातच बसलेल्या पराभवाच्या झटक्यामुळे केंद्रीय नेतृत्वालाही मोठा धक्का बसला.
राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे. राहुल गांधी सरकारवर वारंवार टीका करतात. भारत कुणाच्या विरोधात उभा राहिला आहे, याचं उत्तर फक्त वेळच देईल, असं राजनाथ सिंह म्हणाले. राहुल गांधी आमचे विरोधी नेते आहेत त्यामुळे ते बोलतच राहणार. त्यामुळे देश कुणाच्या विरोधात आहे हे वेळच सांगेल.
दरम्यान, प्रतिष्ठेच्या असलेल्या गोरखपूर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर नामुष्की ओढवली होती. हा पराभव योगी आदित्यनाथ यांच्या जिव्हारी लागला असून, या निवडणुकीत पक्षाला अतिआत्मविश्वान नडल्याचे म्हटले आहे. मात्र वेळीच ठेच लागली आहे. आता या पराभवातून लवकरात लवकर सावरू आणि २०१९ ची निवडणूक जिंकू, असा विश्वास आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.
''आम्ही अतिआत्मविश्वासाने लढलो. त्यामुळेचा आमचा पराभव झाला. निवडणूक असो वा परीक्षा तयारीची एकदा चाचपणी जरूर केली गेली पाहिजे. मात्र या पराभवातून बोध घेऊन भाजपा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करेल." असं आदित्यनाथ यांनी म्हंटलं होतं.