सरसंघचालकांच्या वक्तव्यावरून वाद
By admin | Published: December 4, 2015 01:00 AM2015-12-04T01:00:28+5:302015-12-04T08:39:03+5:30
अयोध्येतील रामजन्मभूमीवर माझ्या हयातीत राम मंदिर उभारले जाईल, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद
कोलकाता/नवी दिल्ली: अयोध्येतील रामजन्मभूमीवर माझ्या हयातीत राम मंदिर उभारले जाईल, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. संघ देशाच्या धार्मिक ऐक्याला तडा देत असल्याचा आरोप काँग्रेसने केला तर भाजपाला राममंदिराचा मुद्दा केवळ जिवंत ठेवायचा असल्याचा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लगावला.
भागवत यांनी बुधवारी कोलकात्यात १९९० च्या कारसेवेदरम्यान पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेले राम आणि शरद कोठारी यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, माझ्या हयातीत राम मंदिर उभारले जाणार असून आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहू आणि यासाठी आम्हाला सज्ज राहायचे आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर हे अमेरिकेच्या आर्थिक क्षमतेचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे अयोध्येतील राममंदिर भारताच्या संस्कृतीचे प्रतीक आहे,अशी भावना भागवत यांनी यावेळी व्यक्त केली.
राजकारणासाठी वापर-काँग्रेस
दरम्यान सरसंघचालकांच्या या वक्तव्याची लागलीच दखल घेत संघ परिवाराकडून अशाप्रकारच्या वक्तव्याची ही काही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेकदा हा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे, याकडे काँग्रेसने लक्ष वेधले.
अशाप्रकारची वक्तव्ये केवळ चिथावणीसाठीच केली जात असून ती देशाच्या ऐक्याला बाधक आहेत,असा आरोप काँग्रेसने नेते पी.सी. चाको यांनी केला. तर पक्षाचे दुसरे नेते दिग्विजयसिंग यांनी भाजपा आणि संघ राममंदिराच्या मुद्यावर देशाची दिशाभूल करीत असून त्याचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा दावा केला.
मुद्दा जिवंत ठेवायचाय-नितीशकुमार
भाजपाच्या मनात श्रीरामाबद्दल श्रद्धा असण्याचे कारण नाही. त्यांना राजकीय लाभासाठी हा मुद्दा जिवंत ठेवायचा आहे, असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटण्यात केला. ते म्हणाले, त्यांनी श्रीरामाला भाजपाच्या सदस्याप्रमाणे वागणूक दिली.
राममंदिरावर न्यायालयाच्या निर्णयाने अथवा परस्पर सहमतीनेच तोडगा निघू शकतो,हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. पण असे न करता ‘मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे’ अशी त्यांची भूमिका आहे,अशी टीका नितीशकुमार यांनी केली.