काँग्रेसमधील पिढीसंघर्षावरील निरुपम यांच्या विधानाने वाद
By admin | Published: September 28, 2015 02:21 AM2015-09-28T02:21:34+5:302015-09-28T02:21:34+5:30
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पक्षातील जुन्या- नव्या पिढ्यांच्या संघर्षाकडे लक्ष वेधताना अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधी यांना
नवी दिल्ली : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पक्षातील जुन्या- नव्या पिढ्यांच्या संघर्षाकडे लक्ष वेधताना अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधी यांना गटनेता ठरविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर पक्ष पुन्हा उभा राहण्याच्या प्रयत्नात असताना अशा विधानांमुळे पक्षाचे नुकसान होईल, अशी भावनाही या नेत्यांनी व्यक्त केली.
निरुपम यांच्या विधानामुळे राहुल गांधी हे युवा नेत्यांचेच प्रतिनिधित्व करतात. ते एक गटनेते ठरतात, असे अप्रत्यक्षरीत्या सूचित केले गेले. त्यावर काँग्रेसमधून कानउघाडणीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे.
राहुल गांधी हे गटनेते नाहीत. ते संपूर्ण काँग्रेसचे नेते आहेत. त्यांची मीडियाने बनविलेली ही प्रतिमा आहे, असे सरचिटणीस शकील अहमद यांनी म्हटले. राहुल गांधी केवळ युवानेत्यांना समोर आणत आहे असे कुणाला वाटत असेल तर ते चूक आहे. गुजरातचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंग सोळंकी, केरळचे प्रदेशाध्यक्ष व्ही.एम. सुधीरन यांचे वय ६० पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, तेलंगणाचे एन. उत्तम रेड्डी हेही साठीच्या घरात आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मनीष तिवारी यांनीही निरुपम यांच्या विधानावर नाराजी दर्शविली. नव्या प्रदेशाध्यक्षांना काँग्रेसच्या जुन्या नेत्यांकडून विरोधाचा सामना करावा लागत असल्याने संघटनात्मक ताकदीवर परिणाम होत असल्याचे निरुपम यांनी म्हटले होते. मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड झाल्यानंतर गटबाजीकडे लक्ष वेधताना निरुपम यांनी थेट उल्लेख टाळला होता. नेतृत्व ही निरंतर प्रक्रिया असून त्यात लोकांचे गळे कापता येत नाही. सार्वजनिक जीवनात सन्मान मिळत असतो, तो मागितला जात नाही. जुना, नवा, मागील, समोरील असा कुणी नसतो. राजकारणात प्रत्येकाला स्वत:चे स्थान बनवावे लागते. त्यासाठी कुणी काही करीत नसतो, असा टोलाही तिवारी यांनी हाणला.(वृत्तसंस्था)