कर्ज वसुली एजंटने गरोदर महिलेला चिरडले, ग्रामस्थ संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 06:36 AM2022-09-18T06:36:16+5:302022-09-18T06:36:43+5:30
महिंद्रा फायनान्स कंपनीने बरियाठ येथील दिव्यांग शेतकरी मिथिलेश मेहता यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज दिले होते
हजारीबाग : हप्ते थकल्याने ट्रॅक्टर ओढून नेत असलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुली एजंटने कर्जधारक शेतकऱ्याच्या गरोदर मुलीला ट्रॅक्टरखाली चिरडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकासह चार जणांविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी विशेष चौकशी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
महिंद्रा फायनान्स कंपनीने बरियाठ येथील दिव्यांग शेतकरी मिथिलेश मेहता यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज दिले होते. कर्जाचे हप्ते थकल्याने कंपनीने एक लाख ३० हजार रुपयांची थकबाकी गुरुवारपर्यंत भरावी, असा संदेश त्यांना पाठवला होता. मात्र, मेहता हप्ते भरू शकले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी फायनान्स कंपनीचे वसुली एजंट, अधिकारी आले व ट्रॅक्टर घेऊन जाऊ लागले. मेहता यांची २७ वर्षीय गरोदर मुलगी मोनिकाने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला चिरडून ट्रॅक्टरचालक पुढे निघून गेला. तिचा जागीच मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)
संतप्त ग्रामस्थांची निदर्शने
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मोनिकाचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन निदर्शने केली. कुटुंबाला तत्काळ दहा लाख रुपयांची भरपाई आणि फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, महिंद्रा फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिश शाह यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. हजारीबाग येथील घटनेने आम्ही सर्वजण व्यथित झालो आहोत. या दु:खाच्या घडीत कंपनी पीडित कुटुंबासोबत असून, घटनेच्या चौकशीसाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असे ते म्हणाले.