सुरतमध्ये देव संघाच्या गणवेशात दिसल्याने वाद
By admin | Published: June 8, 2016 01:57 PM2016-06-08T13:57:42+5:302016-06-08T14:44:52+5:30
मंदिरामध्ये देवाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) गणवेश घातल्याने वाद निर्माण झाला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
सुरत, दि. 08 - मंदिरामध्ये देवाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) गणवेश घातल्याने वाद निर्माण झाला आहे. सुरतमधील मंदिरात स्वामीनारायण देवाला चक्क आरएसएसचा गणवेश घातला गेला आहे. काँग्रेसने हा दुर्देवी प्रकार असल्याचं म्हटलं आहे.
स्वामीनारायण देवाला आरएसएसचा गणवेश घातलेला फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. या फोटोमध्ये देवाला आरएसएसच्या गणवेशाप्रमाणे पांढरा शर्ट, खाटी पँट आणि काळे बूट घातलेले दिसत आहे. इतकंच नाही तर देवाच्या हातात भारताचा झेंडादेखील देण्यात आला आहे.
'हे कपडे एका भक्ताने काही दिवसांपुर्वी दान केले होते. भक्तांनी दिलेले कपडे देवाला घालणे हे आमचे नित्याचेच आहे. आमचा कोणताही अजेंडा नाही. यावरुन वाद निर्माण होईल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती', असं स्वामी विश्वप्रकाशजी यांनी सांगितलं आहे. मंदिर समितीनेदेखील आरएसएसची विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत नसल्याचं म्हणत आरोप फेटाळले आहेत.
काँग्रेसने या सर्व प्रकारावर आक्षेप नोंदवला असून मंदिर समितीने स्वत:ला अशा गोष्टींपासून दूर ठेवलं पाहिजे असं म्हटलं आहे. 'देवाला संघाचे कपडे घालून तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे ? ज्यांनी असं केलं आहे त्यांची दया येते. आज तुम्ही संघाचे कपडे घातलेत उद्या भारतीय जनता पक्षाचा गणवेश घालाल. हे दुर्देवी आहे', अशी टीका वाघेला यांनी केली आहे.