कर्जे माफ झाली का? सर्व शेतकरी म्हणाले हो! इराणी झाल्या गप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 04:45 AM2019-05-10T04:45:21+5:302019-05-10T04:46:14+5:30
मध्यप्रदेशच्या अशोक- नगरमधील प्रचारसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या कमलनाथ सरकारवर जोरदार टीका करताना, तुमच्यातील एका शेतकऱ्याचे तरी कर्ज सरकारने माफ केले का, असा सवाल केला
भोपाळ : मध्यप्रदेशच्या अशोक- नगरमधील प्रचारसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या कमलनाथ सरकारवर जोरदार टीका करताना, तुमच्यातील एका शेतकऱ्याचे तरी कर्ज सरकारने माफ केले का, असा सवाल केला. त्यावर शेतकऱ्यांकडून नाही, असे उत्तर इराणी यांना अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात सर्व शेतकºयांनी एकासुरात होय असे उत्तर दिले. त्यामुळे स्मृती इराणी पुरत्या गडबडून गेल्या.
या सभेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना शेतकºयांची कर्जे माफ करण्याचे आश्वासन दिले होते, याची आठवण करून देत त्यांनी असा सवाल केला होता. ग्वाल्हेर मतदारसंघातील डबरा येथील त्यांच्या सभेला तर गर्दीच जमली नव्हती, बहुतांशी खुर्च्या रिकाम्याच होत्या. त्या व्यासपीठावर गेल्या तेव्हाही समोर श्रोते नव्हते. त्यामुळे कसेबसे दोन-तीन मिनिटांचे भाषण करून त्या तेथून निघून गेल्या. इथे भाजपतर्फे विवेक शेजवळकर लढत आहेत. (वृत्तसंस्था)
काँग्रेसचा टोला
अशोक नगरमधील सभेचा व्हिडीओ दाखवत काँग्रेसने आता तरी भाजप नेत्यांनी खोटे बोलणे थांबवावे, अन्यथा सर्वत्र त्यांची फजितीच होईल, असा टोला लगावला आहे.