धक्कादायक! कर्जाच्या ओझ्यापायी शेतकऱ्याने केली आत्महत्या; शेतातच खाल्लं सल्फास अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 04:32 PM2021-11-03T16:32:15+5:302021-11-03T16:34:14+5:30
Farmer Committed Suicide : कर्जाच्या ओझ्यापायी एका शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कर्जाच्या ओझ्यापायी एका शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका 40 वर्षीय शेतकऱ्यावर तब्बल साडेतीन लाखांचं कर्ज होतं. बँकेने त्याला याबाबत एक नोटीस देखील पाठवली होती. त्यामुळेच शेतकऱ्यांने टोकाचा निर्णय घेतला. अशोक असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून 70 किमी दूर असलेल्या सनावद पोलीस ठाण्याच्या परिसरातील मलगावमध्ये ही घटना घडली. अशोक याने शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्याने मामे भाऊ लखनलाल भायडिया याला फोन करून मी शेतात सल्फास खाल्ल्याचं सांगितलं. हे समजताच लखनलाल आणि त्यांचे काही नातेवाईक हे तातडीने शेतात आले आणि उपचारासाठी अशोकला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
साडे तीन लाखांचं घेतलं होतं कर्ज
शेतकऱ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर उपचारासाठी त्याला इंदूर येथे घेऊन जा असा सल्ला देण्यात आला. मात्र इंदूर येथे घेऊन जातानाच रस्त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. लखनलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोककडे पाच एकर जमीन होती. बँक ऑफ इंडियाच्या बांगरदा शाखेतून त्याने साडे तीन लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्याने काही लोकांकडे पाच लाख उधार मागितलेले. पण त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
नाराज झालेल्या अशोकने त्यामुळेच सल्फास खाल्लं असेल असं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एसपी सिद्धार्थ चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मसगाव येथे एका शेतकऱ्याने सल्फास खाऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यावर बँकेचं साडे तीन लाखांचं कर्ज होतं आणि त्यासाठी बँकेने त्याला नोटीस देखील पाठवली होती. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.