हृदयद्रावक! अपघातात लेकीचा मृत्यू, 12वीत 91% मिळालेले पाहून आई-वडिलांना अश्रू अनावर; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 03:19 PM2023-05-21T15:19:08+5:302023-05-21T15:24:19+5:30
बोर्डाच्या परीक्षेत 91 टक्के गुण मिळवले आहेत. पण गुंजनच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना हा आनंद साजरा करता आला नाही.
राजस्थानमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 17 वर्षीय गुंजनने यावर्षी राजस्थान 12वी बोर्डाची परीक्षा दिली होती. अभ्यासात खूप हुशार असलेल्या गुंजनने तिच्या पालकांना आधीच सांगितले होते की तिला निकालात 90% पेक्षा जास्त गुण मिळतील. आता गुंजनच्या परीक्षेचा निकाल लागला. तिने बोर्डाच्या परीक्षेत 91 टक्के गुण मिळवले आहेत. पण गुंजनच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना हा आनंद साजरा करता आला नाही. 24 एप्रिल रोजी झालेल्या अपघातात गुंजनने जीव गमावला.
आता आपल्या मुलीचं यश पाहून पालकांना अश्रू अनावर झाले. मार्कशीट छातीशी धरून ते रडत आहेत. सांत्वन करण्यासाठी नातेवाईक घरी येऊ लागले आहेत. प्रतिभावान गुंजनचे कौतुक करताना लोक थकत नाहीत. दुसरीकडे तिच्या आईची अवस्था रडून रडून वाईट झाली आहे. रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांनाही धक्काच बसला आहे. मुलीच्या मृत्यूने हतबल झाले आहेत.
राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा निकाल 19 मे रोजी जाहीर झाला आहे. निकाल पाहता गुंजनला गणितात 100 पैकी 100, केमिस्ट्रीत 100 पैकी 85, फिजिक्समध्ये 100 पैकी 92 गुण मिळाल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी शहरातील मुख्य बाजारपेठेत ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या धडकेत गुंजन या बारावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. ती तिच्या मैत्रिणीसोबत स्कूटीवरून कोचिंगला जात होती. यादरम्यान ट्रॅक्टर-ट्रॉलीची धडक बसल्याने ट्रॉलीचा टायर डोक्यावरून गेल्याने ती रस्त्यावर पडली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष आणि प्रादेशिक खासदार ओम बिर्ला गुंजनच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले. दु:खाच्या काळात पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. गुंजनचा फोटो पाहून तिच्या आई-वडिलांना रडू कोसळले. परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी जिवंत असती तर तिला खूप आनंद झाला असता. गुंजनची आई गायत्री यांनी सांगितले की, गुंजनला आयपीएस अधिकारी बनून प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचे होते. पण नियतीने तिला आमच्याकडून हिसकावून घेतले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.