३१ डिसेंबरची डेडलाईन संपली, इंडिया आघाडीच्या जागावाटपाचे घोडे कुठे अडले, डाव्या पक्षांनी सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 07:01 PM2024-01-01T19:01:22+5:302024-01-01T19:02:15+5:30
India Opposition Alliance: इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी १९ डिसेंबर रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये जागावाटप निश्चित करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ ही तारीख निश्चित केली होती. मात्र ही डेडलाईन उलटून २०२४ या नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला हटवण्यासाठी काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीतील घटक पक्षांनी १९ डिसेंबर रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये जागावाटप निश्चित करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ ही तारीख निश्चित केली होती. मात्र ही डेडलाईन उलटून २०२४ या नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये काहीच निश्चित झालेलं नाही. त्यामुळे इंडिया आघाडीमधील घटक पक्ष आता जागावाटपाबाबत सक्रिय होताना दिसत आहेत.
इंडिया आघाडीमध्ये सहभारी असलेल्या डाव्या पक्षांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार जागावाटपाबाबत अनौपचारिक चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या मते आघाडीतील घटक पक्ष आपापल्या पातळीवरा जागावाटपाबाबत चर्चा करत आहेत. काँग्रेस पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्या अंतर्गत बैठकीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करणार आहे. त्यानंतर प्रादेशिक पक्षांसोबत चर्चा सुरू होणार आहे.
डाव्या पक्षांमधील सूत्रांच्या मते वेगवेगळ्या राज्यांमध्ये किरकोळ मतभेद सुरू राहतील आणि निर्णय प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला घ्यावा लागेल, असे नेतृत्वालाही वाटत आहे. जागावाटपाबाबत राजकीय पक्ष जसजसे एकमताच्या दिशेने जातील, तशी औपचारिक बैठकीची तारीखही निश्चित केली जाईल. मात्र इंडिया आघाडीच्या निमंत्रक पदाबाबत सध्या कुठलीही चर्चा झालेली नाही. सध्या संपूर्ण लक्ष हे जागावाटपावर केंद्रीत करण्यात आलेले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत सुप्रीया सुळे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांनी सांगितले की, १५ दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. त्यामध्ये जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर सविस्तर चर्चा झाली होती. तसेच सर्व मुद्द्यांवर तोडगाकाढण्यात आला आहे. आता काही दिवसांमध्येच आम्ही याबाबतची संपूर्ण माहिती सार्वजनिक करणार आहोत.