डिसेंबरपासून दिल्ली-जयपूर फक्त साडेतीन तासांत
By Admin | Published: October 15, 2015 11:29 PM2015-10-15T23:29:59+5:302015-10-15T23:29:59+5:30
गेल्या ३ वर्षांपासून अर्धवट नूतनीकरणाच्या विळख्यात अडकलेला दिल्ली जयपूर २२५ कि.मी.
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
गेल्या ३ वर्षांपासून अर्धवट नूतनीकरणाच्या विळख्यात अडकलेला दिल्ली जयपूर २२५ कि.मी. अंतराचा ६ पदरी प्रशस्त राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८, डिसेंबर महिन्यात तयार होणार असून दोन्हीकडून अवघ्या साडे तीन तासात हे अंतर पार करता येईल.
केंद्रीय भूतल परिवहन व नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसारमाध्यमांच्या १00 प्रतिनिधींसह आयोजित दिल्ली जयपूर महामार्ग कामकाज पहाणी दौऱ्यात ही आश्वासक माहिती दिली. कोणत्याही सबबीविना महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, याचा तमाम यंत्रणांवर नैतिक दबाव तयार करण्यासाठी गडकरींनी हा अभिनव प्रयोग गुरूवारी केला. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी गडकरींसह संयुक्तरित्या पत्रकार परिषदेलाही संबोधित केले.
५५ फ्लायओव्हर्स असलेल्या दिल्ली जयपूर सहा पदरी महामार्गाच्या २२५ कि.मी. अंतराच्या नूतनीकरणाचे काम २00८ सालच्या जून महिन्यात सुरू झाले. देशातल्या १३ बँकांनी या प्रकल्पाला वित्त पुरवठा मंजूर केला. अपेक्षेनुसार २0११ पर्यंत हे काम पूर्ण व्हायला हवे होते. प्रत्यक्षात २0१२ पर्यंत अवघे ६0 टक्के काम पूर्ण झाले. युपीए सरकारच्या अखेरच्या टप्प्यात ते कसेबसे ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. जागोजागचे भू संपादन, पर्यावरण व वन विभागाच्या मंजुऱ्या, आर्थिक अडचणी, आवश्यक सेवांचे स्थलांतर, दुतर्फा अतिक्रमणे दूर करणे, अशा विविध कारणांनी विविध टप्प्यांचे काम बंद पडले होते.
केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पाला गडकरींच्या नेतृत्वाखाली नव्याने वेग देण्यात आला. आता ४ फ्लायओव्हर्स वगळता वर्षभरात १७ टक्के काम पूर्ण करीत एकुण प्रकल्पाचे जवळपास ९५ टक्के काम पूर्ण करण्यात सरकारला यश आले आहे.
कोटपुतलीच्या पत्रपरिषदेत मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी नितीन गडकरींची मुक्तकंठाने प्रशंसा केली. दिल्ली जयपूर महामार्गाचे काम रखडल्यामुळे राजस्थानच्या विकासाची कशी कोंडी झाली होती, याचे वर्णन ऐकवतांना राजे म्हणाल्या, युपीएच्या कारकिर्दीत (सी.पी.जोशी यांचा नामोल्लेख न करता) भूतल परिवहन मंत्रिपदाचा कार्यभार खरं तर राजस्थानच्या प्रतिनिधींकडे होता. त्यांनी पुरेसे लक्ष न घातल्याने या कामाचा खोळंबा झाला.
दिल्लीत मोतीलाल नेहरू प्लेस येथील गडकरी यांच्या निवासस्थानापासून २ लक्झरी बसेसव्दारा सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या विशेष दौऱ्यात स्वत: गडकरी दोन्ही बसेसमधे आळीपाळीने पत्रकारांसोबतच बसले. बसमधे माईकची खास व्यवस्था करण्यात आली होती.