ठरलं! मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार
By पूनम अपराज | Published: September 22, 2020 05:33 PM2020-09-22T17:33:32+5:302020-09-22T17:55:10+5:30
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात चर्चेत असणारे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी अभिनेताच्या मृत्यूबद्दल मुंबई पोलिसांच्या चौकशीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
पटना - बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत ते एनडीएचे उमेदवार बनू शकतात असे वृत्त आहे. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर गुप्तेश्वर पांडे राजीनामा देतील. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात चर्चेत असणारे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी अभिनेताच्या मृत्यूबद्दल मुंबई पोलिसांच्या चौकशीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाने ट्वीट केले आहे की, समाजवादी पार्टी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी युती करणार नसून राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांना पाठिंबा देईल.
बिहारमधील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना, रविवारी भाजपने आपला जाहीरनामा तयार करण्याबाबत जनमत आणि सूचना मिळवण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या महिन्याच्या सुरुवातीला एक ‘रथ’ रवाना केला होता. त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील मतदारांची मतं जाणून घेतली.
बिहार भाजपचे प्रमुख संजय जायसवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांचा पक्ष सूचनेनुसार जाहीरनामा तयार करेल. ते पुढे म्हणाले, "समाजातील सर्व घटकांचे मत जाणून घेण्यासाठी '6357171717' या नंबरवर टोल फ्री नंबर सुरू केला गेला आहे. लोक मिस कॉल देतील आणि त्यांना कॉल केले जातील. यानंतर ते राज्यातील सद्यस्थिती काय आणि आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात काय असले पाहिजे याबद्दल जनता सांगू शकते. ", इंडिया टीव्हीने अशी माहिती दिली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक
फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त
नवीन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्वीकारला पदभार