भाजप-टीडीपीमध्ये ठरलं! आंध्र प्रदेशमध्ये कोण किती जागा लढवणार? वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 03:14 PM2024-03-09T15:14:44+5:302024-03-09T15:15:10+5:30
लोकसभा निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. याआधी सर्व पक्षांनी जारदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आपल्या मित्रपक्षांसोबत जागावाटपाची चर्चा सुरू केली.
लोकसभा निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. याआधी सर्व पक्षांनी जारदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आपल्या मित्रपक्षांसोबत जागावाटपाची चर्चा सुरू केली. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे एनडीए आघाडीत पुनरागमन जवळपास निश्चित झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जागावाटपावर एकमत झाले आहे. आंध्र प्रदेशमध्ये भाजप चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्ष आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत युती करून निवडणूक लढवणार आहे. भाजप आणि जनसेना आंध्रच्या 8 लोकसभा आणि 30 विधानसभा जागांवर निवडणूक लढवू शकतात, तर टीडीपी 17 लोकसभा आणि 145 विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढवू शकतात.
गडकरींना ऑफर देता, मग आम्ही नागपुरात लढायचे कसे?; ठाकरे-सुळेंवर काँग्रेस नाराज
शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी अमित शहा, जेपी नड्डा, चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांच्यात झालेल्या बैठकीत जागावाटपाचा करार झाल्यानंतर नायडूंचा एनडीए आघाडीत परतण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. हे तिन्ही पक्ष एनडीए आघाडीअंतर्गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा लवकरच युतीची घोषणा करू शकतात.
याआधी, ७ मार्च रोजी चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी आंध्र प्रदेशमध्ये युती आणि जागावाटपाबाबत चर्चा केली होती. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये अनेकवेळा चर्चा झाल्यानंतर नायडूंच्या एनडीए आघाडीत परतण्याच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाली आहे.
नायडू माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात एनडीए आघाडीत होते आणि ते पुन्हा एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर भाजपला आंध्र प्रदेशात राजकीय फायदा होणार हे निश्चित आहे. मात्र या करारामुळे दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्येही निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा भाजपला होऊ शकतो, असेही बोलले जात आहे.