अण्णा द्रमुक-भाजपा आघाडीचा निर्णय हाय कमांड घेईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 03:44 AM2018-04-24T03:44:19+5:302018-04-24T03:44:19+5:30
मुखपत्रातील लेखानंतर चर्चेला उधाण
चेन्नई : निवडणुकीत भारतीय जनता पार्टीशी आघाडी करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, तो अधिकार त्यांनाच आहे, असे अण्णा द्रमुकचे नेते व तामिळनाडूचे मत्स्यपालन मंत्री डी. जयकुमार आणि लोकसभेचे उपाध्यक्ष एम. तंबीदुराई यांनी सांगितले. पक्षाच्या मुखपत्रात प्रकाशित लेखाविषयी ते बोलत होते. मात्र त्या लेखामुळे अण्णा द्रमुक-भाजपा आघाडीची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. मुखपत्रातील लेखात म्हटले आहे की, भाजपसोबत काम
करणे म्हणजे ‘डबल बॅरलगन’सारखे आहे. जयकुमार म्हणाले की, आघाडी करण्याचा निर्णय निवडणुकीच्या वेळी घेतला जातो. तो निर्णय हाय
कमांड घेते. भाजपने तामिळनाडूच्या हिताविरुद्ध निर्णय घेतले तर अण्णा द्रमुक विरोध करणार काय? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, होय.
अण्णा द्रमुकमध्ये आजही तेवढीच शिस्त आहे जेवढी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या काळात होती. अण्णा द्रमुकचे मुखपत्र ‘नमदू पुराच्ची तलैवी अम्मा’मध्ये प्रकाशित लेखात म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत असे वाटते की, भाजपसोबत काम करणे म्हणजे ‘डबल बॅरल गन’सारखे आहे. या लेखावर भाष्य करताना लोकसभेचे उपाध्यक्ष तंबीदुराई म्हणाले की, अण्णाद्रमुक आणि भाजप यांच्यात आतापर्यंत कोणताही राजकीय करार वा समझोता झालेला नाही. संसदेत आजही आम्ही वेगळे पक्ष म्हणून काम करतो. (वृत्तसंस्था)
द्रमुकची टीका
द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी अशी टीका केली आहे की, कावेरी पाणी तंटा आणि ‘नीट’सारख्या मुद्यांवर अण्णा द्रमुक व भाजपा सध्याच ‘डबल बॅरल गन’सारखे काम करीत आहेत.