२०१४ पेक्षा अधिक जागा मिळविण्याचा निर्धार, अजेय भाजपाचा नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 04:12 AM2018-09-09T04:12:27+5:302018-09-09T04:12:47+5:30
भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांना सोबत घेत २०१४ पेक्षा अधिक बहुमताने सरकार स्थापन करण्याचा संकल्प केला आहे.
नवी दिल्ली : भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांना सोबत घेत २०१४ पेक्षा अधिक बहुमताने सरकार स्थापन करण्याचा संकल्प केला आहे. सूत्रांनी सांगितले की, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा संकल्प करण्यात आला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत ‘अजेय भाजप’चा नारा देण्यात आला.
सूत्रांनी सांगितले की, या वर्षीच्या अखेरीस मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा संकल्प करण्यात आला. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, २०१९ च्या निवडणुकीत विजयी होण्याचा भाजपला पूर्ण विश्वास आहे. विशेष म्हणजे २०१४ मधील निवडणुकीपेक्षाही अधिक बहुमत मिळवून विजय संपादन करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला. यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे.
२०१४ मध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निवडणुका लढविल्या होत्या आणि त्यात पक्षाला घवघवीत यश मिळाले. चार वर्षात सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. त्यात नोटाबंदी आणि जीएसटीची अंमलबजावणी हे निर्णय महत्वाचे आहेत. पंतप्रधान मोदी यांनी जगभरात अनेक देशात दौरे करुन भारतात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव देऊन शेतकºयांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केलेली आहे.