देशभरात NRC लागू करण्याचा निर्णय अद्याप नाही, फक्त रोहिंग्यांची ओळख पटवली जाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 03:26 PM2021-08-10T15:26:34+5:302021-08-10T15:27:42+5:30
Illegal Rohingya migrants:सरकारने अवैधरित्या भारतात राहणाऱ्या रोहिंग्यांना देशासाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. संसदेत उत्तर देताना, गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं की, राष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत NRC बाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. फक्त रोहिंग्यांची ओळख पटवली जात आहे आणि त्यांना परत पाठवण्याची तयारी सुरू आहे, असे गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी अनेकदा केंद्र सरकारने रोहिंग्यांकडून भारताला धोका असल्याचे म्हटलं आहे.
गृह मंत्रालयानं पुढे सांगितलं की, मागील अनेक दिवसांपासून देशात राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा मुद्दा जैसेथे आहे. देशात राष्ट्रीय स्तरावर अद्याप या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत बोलताना रोहिंग्यांसह इतर सर्व बेकायदेशीर स्थलांतरित नागरिकांना देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचं म्हटलं होतं.
आतापर्यंत दोघांनी काश्मीरमध्ये जमिनी खरेदी केली
मंगळवारी संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाल उत्तर देताना नित्यानंद राय यांनी सांगितलं की, कलम 370 रद्द झाल्यापासून आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरील राज्यातील दोघांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. आता राज्यात जमिनी खरेदी करण्याची प्रक्रीया सोपी करण्यात आल्यामुळे येणाऱ्या काळात अजून लोक या ठिकाणी जमिनी खरेदी करू शकतील.