निवडणुकांवर डोळा ठेवूनच नोटांचा निर्णय?
By admin | Published: November 11, 2016 04:43 AM2016-11-11T04:43:05+5:302016-11-11T04:43:05+5:30
पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदीचा निर्णय घेण्यासाठी सरकारने तशी वेळही अचूक साधल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
मीना कमल, लखनौ
पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदीचा निर्णय घेण्यासाठी सरकारने तशी वेळही अचूक साधल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही पक्षांकडून बेहिशेबी मालमत्ता जमा करण्यात आली आहे. या पक्षांना मोदी सरकारने चेक (शह) दिल्याचे मानण्यात येत आहे.
रोखीच्या पैशांबाबतची आकडेवारीच अधिक बोलकी आहे. उत्तर प्रदेशात मागील तीन लोकसभा निवडणुकांत म्हणजेच २००४, २००९ आणि २०१४ मध्ये राजकीय पक्षांकडे रोखीच्या स्वरूपात जमा झालेली रक्कम १,०३९ कोटी रुपये होती, तर चेकने जमा झालेली रक्कम १,२९९ कोटी रुपये होती. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मने ही माहिती दिली आहे.
राजकीय पक्षांच्या आयकर रिटर्नचे ते विश्लेषण करतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात निवडणूक आयोेगाने कारवाईत ३३० कोटी रुपये जप्त केले होते. अर्थतज्ज्ञ एस.पी. तिवारी म्हणतात की, काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी निवडणुका आणि राजकीय पक्ष हे स्रोत बनले आहेत.
ही आर्थिक आणीबाणी : मायावती
पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेऊन सरकारने आर्थिक आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केली आहे, अशी टीका बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकांत आपले अपयश झाकण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे सांगून मायावती म्हणाल्या की, या निर्णयाने देशातील ९० टक्के नागरिक नाराज आहेत. या निर्णयानंतर नागरिकांत अशी चर्चा आहे की, केंद्र सरकारने अडीच वर्षांच्या काळात आपल्या पक्षाच्या आर्थिक मजबुतीचा सर्व बंदोबस्त करून जनतेला त्रस्त करण्याचे पाऊल उचलले आहे, असेही मायावती म्हणाल्या.
आम्ही काळ्या पैशांविरोधात
आम्हीही काळ्या पैशांच्या विरोधात आहोत; पण अचानक असा निर्णय घेतल्याने अराजक निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेण्यात आल्याचेही मत सपाचे प्रमुख मुलायमसिंह यांनी व्यक्त केले आहे.
हा निर्णय काही दिवसांसाठी मागे घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले की, देशाचा काळा पैसा विदेशात आणि सोन्याच्या स्वरूपात पडला आहे. मोठ्या नोटा बंद केल्याने फक्त सामान्य लोक त्रस्त होत आहेत.
भाजपला फक्त निवडणुका दिसत आहेत, देश नाही. मोदी काही मोठ्या लोकांकडे देशाला गहाण ठेवू इच्छितात, असा आरोपही त्यांनी केला. प्रत्येक महिलेला सरकारने महिना पाच लाखांपर्यंतची रक्कम बँकेत जमा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.