पंचवटीतील मायको दवाखान्यात हिरकणी कक्ष उभारणार जनसुनवाईत निर्णय : उर्मट कर्मचार्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश
By admin | Published: May 22, 2016 07:39 PM2016-05-22T19:39:06+5:302016-05-23T00:20:54+5:30
(दि.२९ एप्रिल हॅलो ७सर्र्वेक्षण बातमीचा कोलाज वापरावा/ प्रभाव लोकमतचा लोगो वापरावा)
(दि.२९ एप्रिल हॅलो ७सर्र्वेक्षण बातमीचा कोलाज वापरावा/ प्रभाव लोकमतचा लोगो वापरावा)
नाशिक : जननी सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व शासकीय निमशासकीय प्रसूतिगृहात प्रसूतीसाठी येणार्या महिलांना काय सुविधा द्याव्यात हे निर्धारित असतानाही महापालिकेच्या मायको रुग्णालयात मात्र प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात आणि तेथून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते; मात्र आता ही अवहेलना थांबणार असून मायको रुग्णालयातच महिलांची प्रसूती करण्यात येईल. या रुग्णालयात हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येणार असून नवजात शिशुंसाठी बालरोगतज्ज्ञ नियुक्त करण्यात येणार आहे.
पंचवटीतील फुलेनगर येथे झालेल्या जनसुनवाईत हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे पसिरातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिकेच्या रुग्णालय आणि प्रसूतिगृहात चांगल्या सेवा मिळत नसल्याच्या तक्रारीवरून लोकनिर्णय संस्थेच्या वतीने सहा महिन्यांचे सर्वेक्षण केले होते. २३ महिलांच्या प्रसूतीसाठी पालिकेच्या रुग्णालयात टोलवाटोलवी होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लोकमतने या विषयाला व्यापक प्रसिद्धी दिली होती. त्यानंतर पालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांच्याशी या विषयावर संपर्क साधल्यानंतर त्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन लोकमतला दिले होते, तर लोकनिर्णयच्या वतीने आरोग्य हक्काची जनसुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ही सुनावणी मायको रुग्णालय म्हणजेच सावित्रीबाई फुले रुग्णालयात पार पडली. यावेळी महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या प्रा. कविता कर्डक, लोकनिर्णयचे संतोष जाधव तसेच पालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी फुलेनगरमधील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात पालिकेच्या रुग्णालयात येणार्या अडचणींचा पाढाच जाधव यांनी वाचला आणि समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावर चर्चेअंती विविध निर्णय घेण्यात आले असून या रुग्णालयात येणार्या महिलांना अन्यत्र पाठविले जाणार नाही. अत्यंत क्लिष्ट जोखमीची प्रसूती असेल तरच महिलांना पालिकेच्या अन्य रुग्णालयात पाठविण्यात येईल. तसेच दवाखान्यात हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर यावेत यासाठी थम्ब इंप्रेशन मशीन बसविण्यात येणार आहे. रुग्णालयात कायमस्वरूपी रुग्णवाहिकेची व्यवस्था व टोल फ्री क्रमांक घोषित करण्यात येणार आहे. रुग्णालयात पाणी व अन्य सोयी केल्या जातील. तसेच शौचालय आणि रुग्ण कक्ष स्वच्छ ठेवण्यात येईल असे ठरविण्यात आले. इंदिरा गांधी रुग्णालयातही थम्ब इंप्रेशन आणि जलशुद्धिकरण सयंत्र बसविण्यात येणार आहे.
जोड