कायदे रद्द करण्याचा निर्णय बुधवारी होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 06:31 AM2021-11-22T06:31:51+5:302021-11-22T06:32:24+5:30
सरकारने कायदे रद्द केले तरी शेतकरी नेते आपले आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. किमान हमी भावाचा कायदा करावा अशी त्यांची मागणी आहे.
नवी दिल्ली : तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या येत्या बुधवारी (दि. २४) होणाऱ्या बैठकीत मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांकडून होत असलेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर हे कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली होती.
संसदेच्या आगामी अधिवेशनात हे कायदे रद्द करण्यात येतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन घरी परत जावे, असे आवाहनही मोदी यांनी केले होते. त्यामुळे बुधवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांबाबत आणखी काय निर्णय होतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांची आज महापंचायत
सरकारने कायदे रद्द केले तरी शेतकरी नेते आपले आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. किमान हमी भावाचा कायदा करावा अशी त्यांची मागणी आहे. लढ्याची पुढची दिशा ठरविण्यासाठी संघटनांनी लखनऊमध्ये आज, सोमवारी महापंचायतीचे आयोजन केले आहे.