फेक न्यूज संदर्भातील निर्णय केंद्र सरकारनं घेतला मागे, मोदींचा स्मृती इराणींना घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 12:38 PM2018-04-03T12:38:14+5:302018-04-03T12:38:14+5:30
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेक न्यूजसंदर्भातील निर्णय मागे घेतला आहे.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रालयानं फेक न्यूजसंदर्भातील निर्णय मागे घेतला आहे. फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार नाही. गेल्या काही तासांपूर्वीच सरकारनं हा नियम लागू केला होता. अखेर वाढता विरोध पाहता सरकारनं हा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्मृती इराणींना घरचा आहेर दिल्याची चर्चा आहे.
या नियमानुसार, पहिल्यांदा फेक न्यूज दिल्यास सहा महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी, तर तिसऱ्यांदा नियमाचं उल्लंघन केल्यानंतर पत्रकाराची कायमस्वरूपी मान्यताच रद्द केली जाणार होती. परंतु सरकारवर हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानंतर माहिती व प्रसारण मंत्रालयानं हा निर्णय मागे घेतला आहे. आता फक्त प्रेस काऊन्सिलमध्येच अशा प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.
या निर्णयाला काँग्रेसनंही जोरदार विरोध केला होता. काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सरकारच्या फेक न्यूजसंदर्भातील निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पत्रकारांना मोकळेपणानं रिपोर्टिंग करण्याला मज्जाव करण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे. कोणती बातमी खोटी आणि कोणती बातमी खरी हे कसं समजणार, असा सवालही अहमद पटेल यांनी उपस्थित केला होता. या निर्णयाच्या माध्यमातून पत्रकारांची गळचेपी करण्याची सरकारची भूमिका तर नाही ना, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली होती.
#FLASH: Prime Minister has directed that the press release regarding fake news be withdrawn and the matter should only be addressed in Press Council of India. pic.twitter.com/KVUBeAoDhC
— ANI (@ANI) April 3, 2018