बेळगाव जिल्ह्याचे लवकरच त्रिभाजन, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 02:02 PM2023-08-18T14:02:13+5:302023-08-18T14:02:46+5:30
बेळगाव हा राज्यात सर्वात मोठा जिल्हा
बेळगाव : बेळगाव शहर आणि बेळगाव ग्रामीण असे दोन वेगवेगळे तालुके करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. बेळगाव तालुक्याचे विभाजन नक्कीच होणार मात्र कोणत्या पद्धतीने विभाजन करायचे याबद्दल अधिकारी निर्णय घेतील, असेही सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत जिल्ह्यातील आमदारांसोबत पहिल्या टप्प्याची चर्चा झाली आहे. चिकोडी आणि गोकाक असे दोन नवीन जिल्हे करा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे, ती लवकरच करू, असेही सतीश यांनी म्हटले आहे.
१९८० साली पहिल्यांदा जे. एच. पटेलांनी जिल्हा विभाजनाची वात पेटवून दिली. त्यानंतर चिकोडी हा स्वतंत्र जिल्हा व्हावा, या मागणीला जोर आला. १९९७ नंतर ही मागणी अधिक जोर धरू लागली आणि बेळगाव जिल्ह्याचे तीन जिल्ह्यात विभाजन व्हावे, असा प्रस्ताव समोर आला. त्यानुसार बेळगाव, चिकोडी आणि गोकाक जिल्हा व्हावा, अशी मागणी होत राहिली. त्याला स्वातंत्र्यदिनी ना. जारकीहोळी यांनी हूल दिली. त्यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे.
बेळगाव हा राज्यात सर्वात मोठा जिल्हा आहे. तब्बल ४७ लाखांहून अधिक लोकसंख्येच्या या जिल्ह्यात १८ विधानसभा, तीन लोकसभा मतदारसंघ आहेत. १५ तालुके, ५०६ ग्रामपंचायती, ३४५ तालुका पंचायत सदस्य आणि १०१ जिल्हा पंचायत सदस्य आहेत. विस्ताराने सर्वात मोठा जिल्हा म्हणून बेळगावची ओळख असली तरी विकासाच्या दृष्टिकोनातून मागासलेला जिल्हा आहे. हा जिल्हा मराठी, कन्नड आणि हिंदी असा बहुभाषिक आहे.
विस्ताराने मोठा असल्याने बेळगाव जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. याबाबत वेळोवेळी चर्चा झाल्या. चिकोडीत तर दरवर्षी याबाबत आंदोलने झाली आहेत. त्याचाच धागा पकडून ना. जारकीहोळी यांनी जिल्हा आणि तालुका विभाजनाचे सूतोवाच केले आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगताना लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
कसे असतील संभावित नवे जिल्हे?
बेळगाव जिल्हा : बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, यमकनमर्डी, हुक्केरी, खानापूर
गोकाक / बैलहोंगल : बैलहोंगल, रामदुर्ग, कित्तूर, गोकाक, मुडलगी
चिकोडी : चिकोडी, अथणी, कागवाड, निपाणी, रायबाग, कुडची