नोटा काढून घेण्याचा निर्णय नवा नाही!
By admin | Published: November 9, 2016 04:57 AM2016-11-09T04:57:31+5:302016-11-09T04:57:31+5:30
चलनातून ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा अचानक काढून घेण्याचा सरकारचा निर्णय नवा नाही.
नवी दिल्ली : चलनातून ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा अचानक काढून घेण्याचा सरकारचा निर्णय नवा नाही. यापूर्वी जानेवारी १९४६ मध्ये आणि त्यानंतर पुन्हा १९७८ मध्ये १००० रुपये आणि त्याहून मोठ्या रकमेच्या नोटा परत घेण्यात आल्या आहेत.
रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत छापलेली सर्वात मोठी नोट दहा हजार रुपयांची असून १९३८ आणि त्यानंतर १९५४ मध्ये या नोटेची छपाई करण्यात आली होती. तथापि, या नोटा आधी जानेवारी १९४६ मध्ये आणि नंतर जानेवारी १९७८ मध्ये परत घेण्यात आल्या. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. जानेवारी १९४६ पूर्वी १,००० आणि १०,००० रुपयांच्या बँक नोटा चलनात होत्या. त्यानंतर बँकेने १९५४ मध्ये १,००० रुपये, ५,००० रुपये आणि १०,००० रुपयांच्या नोटा जारी केल्या. या सर्व नोटा १९७८ मध्ये परत घेण्यात आल्या. नोव्हेंबर २००० मध्ये १,००० रुपयांची नोट पुन्हा जारी झाली. तत्पूर्वी आॅक्टोबर १९८७ मध्ये ५०० रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती. आता लवकरच २ हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात येणार असून, या मूल्याची नोट देशाच्या इतिहासात प्रथमच वापरात येणार आहे. (प्रतिनिधी)