राज्यसभेमध्ये पंतप्रधानांच्या विरुद्ध घोषणा
By admin | Published: May 10, 2016 03:24 AM2016-05-10T03:24:35+5:302016-05-10T03:24:35+5:30
केरळमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात इटलीचा संबंध कोणाशी आहे, हे सर्वांनाच माहीत आहे, असे सांगत काँग्रेस नेत्यांवर आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी
प्रमोद गवळी,नवी दिल्ली
केरळमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात इटलीचा संबंध कोणाशी आहे, हे सर्वांनाच माहीत आहे, असे सांगत काँग्रेस नेत्यांवर आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस सदस्यांनी सोमवारी राज्यसभेत केली. काँग्रेस सदस्यांनी या मागणीसाठी घोषणाबाजी केल्यामुळे कामकाजात सतत अडथळे येत राहिले.
राज्यसभेत शून्य प्रहर सुरू होताच, काँग्रेसचे जयराम रमेश उभे राहिले. आपण अगुस्ता वेस्टलँडप्रकरणी सादर केलेली कागदपत्रे राज्यसभेत स्वीकारली आहेत, या सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटचा उल्लेख करून ते म्हणाले की, वास्तविक स्वामी यांना खरे बोलण्याची सवय नाही. असे असताना त्यांनी सादर केलेली कागदपत्रे राज्यसभेने कशी स्वीकारली, असा प्रश्न रमेश यांनी केला. त्यावर उपसभापती पी. जे. कुरियन यांनी खुलासा केला की, स्वामी यांनी कागदपत्रे कार्यालयात केवळ जमा केली आहेत. मात्र ती स्वत: स्वामी यांनीही प्रमाणित केलेली नाहीत. त्यांच्या या खुलाशाचे काँग्रेस सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.
नंतर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी एका वृत्तपत्राचा हवाला देत आरोप केला की निवडणुकीच्या दरम्यान अगुस्ताच्या निमित्ताने काँग्रेसला बदनाम करण्याचे प्रयत्न सध्या भाजपातर्फे सुरू आहेत. वास्तविक, या विषयावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा होत असून, त्यात कुठेही यूपीएच्या एकाही नेत्याचे नाव आलेले नाही. असे असताना जाहीर सभांमध्ये काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न सुरू असून, ते सहन केले जाणार नाहीत. बोफोर्सप्रकरणीही असेच आरोप झाले. पण ते सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे अगुस्ता प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय तपास व्हावा, अशी आमची मागणी आहे.
त्या वेळी अगुस्ताप्रकरणात लाच घेणाऱ्यांना आम्ही मोकळे सोडणार नाही, असे विधान संसदीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केले. पण इथे या विधानाचा संबंध नाही, असे सांगत काँग्रेस सदस्यांनी ‘प्रधानमंत्री झुठे है, नरेंद्र मोदी माफी मांगो’ अशा घोषणा सुरू केल्या. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १0 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियमांचे उल्लंघन केले असून, त्यांनी दोन्ही सभागृहांत याबाबत खुलासा करायला हवा, अशी मागणी काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी केली.
काँग्रेसचे प्रमोद तिवारी यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर खोटे बोलत असल्याचा आरोप केला. पंतप्रधानांनी आपले विधान मागे घ्यावे, अशी मागणी शर्मा यांनी केली. त्यावर तुम्ही हक्कभंगाची सूचना द्या, ती घेण्याबाबत विचार केला जाईल, असे उपसभापतींनी त्यांना सांगितले. त्यावर काँग्रेस सदस्यांनी पुन्हा मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा सुरू केल्या.