"भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेणार", संत परमहंस यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 08:23 PM2021-09-26T20:23:37+5:302021-09-26T20:24:47+5:30
Hindurashtra News: काही महिन्यांपूर्वी संत परमहंस यांनी हिंदूराष्ट्राबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर आत्मदाह करण्याची घोषणा केली होती. मात्र चितेवर बसत असतानाच तिथे पोलीस दाखल झाले होते.
अयोध्या - अयोध्येतील तपस्वी छावणीमधील संत परमहंस यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. रविवारी तपस्वी छावणीमध्ये सनातन धर्मसंसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर संत परमहंस यांनी ही घोषणा केली आहे. १ ऑक्टोबर रोजी देशातील नागरिकांची एक मोठी सनातन धर्मसंसद आयोजित होईल. यामध्ये भारताला हिंदूराष्ट्र बनवण्यावर चर्चा होईल. संत परमहंस यांनी सांगितले की, यावर जर केंद्र सरकारने काही निर्णय घेतला नाही तर २ ऑक्टोबर रोजी ते शरयू नदीमध्ये जलसमाधी घेतील.
काही महिन्यांपूर्वी संत परमहंस यांनी हिंदूराष्ट्राबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर आत्मदाह करण्याची घोषणा केली होती. मात्र चितेवर बसत असतानाच तिथे पोलीस दाखल झाले होते. त्यांनी त्यांची समजूत घालून त्यांना थांबवले होते. दरम्यान, आता संत परमहंस यांनी एक अजून घोषणा केली आहे. जर १ ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदूराष्ट्र घोषित केले नाही तर ते २ ऑक्टोबर रोजी शरयू नदीत जलसमाधी घेतील. आता जसजशी २ ऑक्टोबर ही तारीख जवळ येत आहे तसतशा संत परमहंस यांच्या हालचालींना वेग आला आहे.
तपस्वी छावणीचे संत परमहंस दास यांनी सांगितले की, १ ऑक्टोबर रोजी सर्व संघटनांचे लोक हिंदू सनातन धर्मसंसदेचे आयोजन करतील आमि २ ऑक्टोबर रोजी जर आमचे म्हणणे ऐकले गेले नाही तर मी शरयू नदीत जलसमाधी घेईन, मी समाधी घेतल्यानंतर कदाचित माझ्या श्रद्धांजलीमध्ये मोदीजी भारताला हिंदूराष्ट्र घोषित करतील, कारण जर हिंदू वाचला नाही तर काहीच वाचणार नाही.
त्यांनी सांगितले ज्याप्रकारे काश्मीरमध्ये धर्माच्या आधारावर घोषणा होतात. जर हिंदू राष्ट्र घोषित केले नाही तर हिंदू अल्पसंख्याक होऊन जाईल. त्यापासून वाचण्यासाठी हिंदू राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे. कारण हिंदू तेवढाच उदारमतवादी आहे की हिंदू राष्ट्र घोषित झाल्यावरही दुसऱ्यांना त्रास होणार नाही.