Myucormicosis: म्युकरमायकोसिसला साथरोग जाहीर करा; केंद्रीय आरोग्य खात्याची राज्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 06:25 AM2021-05-21T06:25:53+5:302021-05-21T06:26:14+5:30
ज्या कोरोना रुग्णांना स्टेरॉइड देण्यात आले होते किंवा ज्यांना मधुमेहाचा विकार आहे, अशा रुग्णांमध्ये या बुरशीचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे.
नवी दिल्ली : कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी या आजाराचाही आता साथीचा रोग नियंत्रण कायद्यात समावेश करावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य खात्याने सर्व राज्यांना केली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याचे सहसचिव लव अग्रवाल यांनी राज्यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, ज्या कोरोना रुग्णांना स्टेरॉइड देण्यात आले होते किंवा ज्यांना मधुमेहाचा विकार आहे, अशा रुग्णांमध्ये या बुरशीचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. या रुग्णांवर उपचार करताना नेत्रविकारतज्ज्ञ, नाक, कान, घसाविकारतज्ज्ञ, जनरल सर्जन, न्यूरोसर्जन, दंतविकारतज्ज्ञ यांचे सहकार्य घ्यावे लागेल, तसेच अॅम्फोटेरिसिन या औषधाचा वापर करावा लागेल.
उपचारासाठी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे सर्व रुग्णालयांनी, वैद्यकीय महाविद्यालयांनी पालन करावे. या बुरशीच्या संसर्गाने दृष्टीवर परिणाम होणे, छातीत दुखणे, श्वसनास त्रास होणे, कफातून रक्त पडणे असा त्रास होऊ शकतो. तसेच दातदुखी, दात हलणे, डोकेदुखी, सायनस, अशक्तपणा जाणवणे अशी या आजाराची आणखी काही लक्षणे आहेत, असेही पत्रात म्हटले आहे.
राजस्थान, तेलंगणाचे पुढचे पाऊल
राजस्थान व तेलगंणा या राज्यांनी याआधीच म्युकरमायकोसिस हा साथीचा रोग असल्याचे जाहीर केले आहे. तामिळनाडूमध्ये या बुरशीच्या संसर्गाचे आतापर्यंत नऊ रुग्ण आढळले आहेत. तरीही तामिळनाडूने हा संसर्ग आजार असल्याचे सार्वजनिक आरोग्य कायद्यांतर्गत जाहीर केले आहे.
पांढऱ्या बुरशीचा धोका
ब्लॅक फंगस या नव्या धोकादायक आजाराचे रुग्ण वाढत असतानाच आता आणखी एक आजार डोकेदुखी वाढवू शकतो. देशात ‘व्हाईट फंगस’ या संसर्गाचे रुग्ण आढळले आहेत. हा संसर्ग ‘म्युकरमायकोसिस’पेक्षाही अतिशय धोकादायक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. बिहारमध्ये याचे काही रुग्ण आढळले आहेत.