घोषित काळ्या पैशाची रक्कम ४१४७ कोटींवर
By admin | Published: October 6, 2015 04:20 AM2015-10-06T04:20:23+5:302015-10-06T04:20:23+5:30
सरकारने काळ्या पैशाबाबत स्वेच्छा कबुली देण्यासाठी (कॉम्प्लयान्स विंडो) घालून दिलेल्या ९० दिवसांच्या मुदतीत घोषित रकमेचा ४१४७ कोटी रुपयांचा सुधारित आकडा सरकारने
नवी दिल्ली : सरकारने काळ्या पैशाबाबत स्वेच्छा कबुली देण्यासाठी (कॉम्प्लयान्स विंडो) घालून दिलेल्या ९० दिवसांच्या मुदतीत घोषित रकमेचा ४१४७ कोटी रुपयांचा सुधारित आकडा सरकारने सोमवारी जारी केला. यापूर्वी ही रक्कम ३७७० कोटी रुपये असून ही आकडेवारी अंतिम नसल्याचे सरकारने नमूद केले होते, असे महसूल सचिव हसमुख अधिया यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात आणखी ६३८ कोटी रुपयांची विदेशी मालमत्ता जाहीर झाल्यामुळे अंतिम आकडा वाढला. सरकारला त्यातून एकूण २४८८.२० कोटी रुपयांचा कर मिळणार आहे. यापूर्वी १ जून रोजी एकूण घोषणापत्रांची संख्या जाहीर करण्यात आली होती; मात्र मालमत्तेच्या अंतिम आकडेवारीची घोषणा केली नव्हती. विदेशी मालमत्ता स्वेच्छेने घोषित करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. काळ्या पैशासंबंधी कठोर कायद्याच्या कचाट्यातून सुटका, तसेच ६० टक्के कर आणि दंड टाळण्यासाठी ९० दिवसांची सवलत देण्यात आली होती.
संपत्ती घोषित करण्याचे टाळत ज्यांनी जोखीम पत्करली त्यांना परिणाम भोगावे लागतील. आम्ही कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करणार आहोत, असे अधिया यांनी सांगितले.
अमेरिकेसोबत विदेशी खाते कर पूर्तता कायद्यावर (एफएटीसीए)स्वाक्षरी झाली असल्यामुळे अमेरिकेतील मालमत्तेबाबत यापूर्वीच माहिती मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली
आहे.
एचएसबीसी स्वीस खात्यातील ४३ नावांची माहिती मिळताच एकूण १३२ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत, असेही अधिया म्हणाले.
५० पेक्षा जास्त देशांनी करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. २०१७ पासून अनेक देश भारतीयांच्या खात्यांबाबत नियमित माहिती देणे सुरू करतील. कर टाळण्याचे किंवा कर चुकवेगिरीची प्रकरणे समोर आल्यास आम्ही दंड ठोठावणे, खटले दाखल करण्यासारखी कारवाई सुरू करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)